सनातन संस्थेच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आरोप केले जातात. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला संस्थेला कारणीभूत ठरवण्यात येत आहे. त्यामुळे आता सनातन संस्था अशा प्रकारे संस्थेवर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा पूर्ण प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक अशा दोन वेगवेगळ्या गटांतून चालू आहेत. त्यात वर्षभर निष्क्रिय असलेले दोन्ही गट आता 20 ऑगस्ट रोजी कार्यक्रमांची भरमार करून ‘आम्हीच कसे खरे अनुयायी आहोत’, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेत हमीद दाभोलकर गटाने थेट ‘हास्यजत्रा’वाल्यांना पाचारण करून दाभोलकरांच्या स्मृतिदिनाला हास्यास्पद केले आहे, तर अविनाश पाटील यांच्या दुसर्या गटाने अविवेकी होऊन न्यायालयाने निकाल देण्याची वाट न पाहता थेट सनातन संस्थेला दोषी ठरवून टाकले आहे. आता त्यांनी सनातन संस्थेला केवळ फाशीची शिक्षा देणेच शिल्लक ठेवले आहे; मात्र अविवेकाच्या अतिरेकामुळे ते विसरले आहेत की, भारतात संविधान, कायदा आणि न्यायालय या व्यवस्था आहेत. त्यात सनातन संस्था कुठेही दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या बदनामीचा नक्कीच समाचार घेणार आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार. त्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहोत. त्यामुळे सनातन संस्थेच्या बदनामीची मोहीम चालवणार्यांनी वक्तव्ये करताना हे लक्षात घेऊन बोलावे, असा इशारा सनातन संस्थेने दिला आहे.
(हेही वाचा Gaming Industry : विदेशी गेमिंग कंपन्यांकडून कोट्यवधींची कर चुकवेगिरी; सरकारचा अहवाल)
Join Our WhatsApp Community