मराठी भाषा मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच मराठी भाषा आणि तिचा गौरव वाढवणारे पहिले मराठी भाषा विद्यापीठ विधेयक (Legislative Assembly) मंगळवारी, १९ डिसेंबरला विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. (Vidhan Parishad)
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर अमरावती या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती’ हे विधेयक मांडले. त्याला सभागृहात चर्चेनंतर एकमताने मंजूर करण्यात आले. या विद्यापीठाच्या कार्यकक्षा केवळ महाराष्ट्रातच नाहीत, तर देशात आणि परदेशातही असतील यासाठी राज्याने केंद्र सरकारच्या परवानगीने राज्याबाहेर आणि परदेशात प्रादेशिक केंद्र किंवा उपकेंद्र स्थापन केले जातील तसेच आंतरराष्ट्रीय केंद्रही स्थापन केले जाईल.
ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात राज्यभरातील मराठी भाषा, संस्कृती आदी संदर्भातील सखोल अभ्यास करून त्यासाठीचा प्रस्ताव उच्च तंत्र शिक्षण विभागाला सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये चर्चेला आणले गेले होते.
‘ही’ महत्त्वाची भूमिका बजावणार…
मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आणि मराठीमध्ये रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी तसेच बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या उपयोजकांमध्ये मराठी भाषेच्या वापरात प्रोत्साहन देण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडताना व्यक्त केला. तसेच मराठी भाषेमध्ये उच्चस्तरीय संशोधन केंद्र म्हणून देखील हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यासोबत राज्यातील मराठी भाषेच्या विविध बोलीभाषांचा अभ्यास करणे आधुनिक ज्ञानभाषा व शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा विकास करणे असे अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टे या विद्यापीठाच्या माध्यमातून साध्य केली जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community