भंडा-यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

193

भंडारा जिल्ह्यातील लाखानदूर येथे अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी अज्ञान वाहनचालकाविरोधात तपास सुरु केल्याची माहिती भंडारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली.

( हेही वाचा : पावसामुळे मोठे नुकसान, पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश)

लाखानदूर येथून साकोली-वडसाला जाणा-या राष्ट्रीय महामार्ग ३५३वर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शहरांतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांनी बिबट्याला जखमी अवस्थेत पाहिले आणि वनाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याआधी जवळच्या साकोली परिसरातही दोन महिन्यांपूर्वी बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. भंडा-यातील लाखानदूर परिसर हा शेती आणि साखर कंपन्याच्या विस्तीर्ण परिसरासाठी ओळखला जातो. या भागांत गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. मात्र अपघाताच्या घटना शहरांत अभावानेच घडतात.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेत अपघाताच्या काही अंतरावर टायर्सच्या पाऊलखुणा दिसल्या. त्याआधारे चारचाकी वाहनासमोर बिबट्या आला असावा आणि धडक रोखण्यासाठी चालकाने जोराचा ब्रेक लावला असावा, अशी शक्यता गवई यांनी वर्तवली.  संबंधितांनी अपघाताबाबत वनविभागाला माहिती देणे जरुरीचे असते. तसे न घडल्याने प्रकरणाची चौकशी सुरु केल्याचे गवई म्हणाले. बिबट्याचे शवविच्छेदनही पूर्ण झाले आहे. पशुवैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा महिन्यांच्या मादी बिबट्याला जोरदार वाहनाने धडक दिल्याने तिची तीन हाडे मोडून पोटालाही जखमा झाल्या. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. याबाबत महाविद्यालयातील अधिका-यांकडून माहिती मिळण्याच्या प्रयत्नांत आम्ही आहोत, असे गवई म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.