नागपूर येथील कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात गेल्या दीड महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात बुधवारी सकाळी वनाधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना यश आले. हा बिबट्या शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याने सायंकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
( हेही वाचा : दिवाळीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; मुंबईत ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त)
कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला लागून गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा भाग आहे. या भागातील बफर क्षेत्रात बिबट्यांचा मुक्त वावर आहे. गोरेवाडा आणि कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची लागूनच भिंत असल्याने बिबट्या केंद्रातील परिसरात आला असावा किंवा अंबागरी परिसरातून आला असावा, असा प्राथमिक अंदाज नागपूर वनविभागाचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी व्यक्त केला. वीजनिर्मिती केंद्रातही बराचसा भाग जंगल परिसर आहे. संकुलातील कर्मचा-यांकडे पाळलेली कुत्री बिबट्याचे आयते भक्ष्य बनले होती. बिबट्या वीज निर्मिती केंद्रात काम करणा-या कर्मचा-यांसमोरुन सहज संचार करायचा. बिबट्याच्या सहज होणा-या दर्शनामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. वनविभागाच्या टेहाळणी पथकाच्या वाहनासमोरुनही बिबट्या सहज जात होता. परिसर तसेच इमारतीतील संकुलात लावले्लया सीसीटीव्ही कॅमे-यातही बिबट्याचे दर्शन घडत होते. त्यामुळे बिबट्याला पकडण्याची मागणी दिवसेंदिस जोर धरु लागली होती. परंतु काही केल्या बिबट्या पिंज-यात येत नव्हता. अखेरीस परिसरातील कुत्र्यांचाच वनाधिका-यांनी अगोदर बंदोबस्त केला. कर्मचा-यांनी घरातील कुत्री बाहेर न काढण्याचे आदेश वनाधिका-यांनी दिले. त्यामुळे बिबट्याला भक्ष्य मिळणे कठीण झाले. अखेरिस पिंज-यात ठेवलेली बकरी खायला बिबट्या आला आणि जेरबंद झाला. तपासणीनंतर सायंकाळी उशिराने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वाहनाचा दरवाजा उघडताच बिबट्याने धूम ठोकली आणि सेकंदातच गायब झाला.
अंदाजे ८ ते ९ वर्षांची मादी बिबट्या शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असून, तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
– डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग (प्रादेशिक
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत साहाय्यक वनसंरक्षक एस. टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमाणे, रीना राठोड, विजय गंगावणे, निशिकांत वाघ, वनपाल कुरेशी, वनपाल दिव्या बढीये, वनरक्षक सरदार, वनरक्षक हरिश किनकर तसेच नागपूर ट्रान्सिट सेंटरचे प्रमुख कुंदन हाते आणि मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांनी सहभाग नोंदवला.
Join Our WhatsApp Community