जुलै महिन्याच्या पावसाच्या पाण्यात दक्षिण मुंबईत लेप्टोचा प्रसार प्रामुख्याने होत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबईभरात सर्वात जास्त लेप्टोचे रुग्ण एल्फिन्स्टनमध्ये आढळून आले आहेत. एल्फिन्स्टनमध्ये ११ लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण सापडले आहेत. एल्फिन्स्टन खालोखाल भायखळ्यात १०, कुर्ल्यात ७, दादरमध्ये ६ तर चेंबूर परिरात ६ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोची लक्षणीय रुग्णसंख्या एल्फिन्स्टन, भायखळा, कुर्ला, दादर तसेच चेंबूर परिसरात प्रामुख्याने आढळून आल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या नोंदीतून आढळले आहे.
पालिका आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक विभागात आता तपासणी करण्याची सुरुवात केली आहे. तापाचे रुग्ण आढळल्यास त्याला लेप्टोचीही लागण असल्याच्या संशयातून आरोग्य सेविकांनी संबंधित रुग्णाने पाण्यात प्रवास केला आहे का, याची माहिती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पालिकेने जलविभाग तसेच घनकचरा व्यवस्थापनाचीही लेप्टो प्रतिबंधात्मक कामासाठी मदत घेतली आहे.
लेप्टोस्पायरोसिसविषयी माहिती
- लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा या रोगजंतूमुळे होणारा आजार आहे. हा पाण्याशी संबंधित आजार आहे. कोकण विभागात हा आजार प्रामुख्याने आढळतो. रोगबाधित उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्याल लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो)ची बाधा होते.
- पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात दूषित झालेला परिसर या आजाराचे प्रमुख स्त्रोत आहे.
- हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे.
- संसर्ग झालेल्या जनावराच्या मूत्र, रक्त किंवा मांसाशी संपर्क आल्यास या आजाराचा ्रसार होतो. शरीरावरील जखम किंवा नाक, तोंड, डोळे यांच्या अभित्वचेमार्गे या रोगाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात.
- हा आजार ७ ते १२ दिवसांच्या काळात बळकावतो
(हेही वाचा मल्लिकार्जुन खर्गे यांचीही ईडीकडून चौकशी, नॅशनल हेराल्ड प्रकरण भोवणार )
लेप्टोची लक्षणे
- तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाडणे, डोळे सुजणे
- मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यूही ओढावतो. ब-याचदा रुग्णांची लक्षणे किरकोळ व समजून न येणारी असतात
तपासणी
रॅपीड डायग्नोस्टीक कीट किंवा एलायझा चाचणी लेप्टोच्या निदानासाठी केली जाते
उपचार
पेनिसिलिन, डॉक्सीसायक्लीन, टेट्रासायक्लिन ही प्रतिजैविके या आजारासाठी प्रभावी ठरतात.
प्रतिबंधात्मक उपाय
- दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी मानवी संपर्क टाळणे
- दूषित पाण्याशी संपर्क अपरिहार्य असल्यास रबर बूट, हात मोजे वापरावेत. कोकणात भातशेतीत काम करणा-या माणसांसाठी हे फार महत्त्वाचे आहे
- प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे
- परिसरातील उंदीरांचे नियंत्रणही महत्त्वाचे