एक तरुणी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे, असे ट्वीट मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर येताच, मुंबई पोलिसांची यंत्रणा कामाला लागली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या तरुणीचा ठावठिकाणा शोधून तेथील स्थानिक पोलिसांना याबाबत सूचना दिली. स्थानिक पोलिसांनी वेळीच दिलेल्या पत्त्यावर धाव घेऊन, आत्महत्येच्या तयारीत असलेल्या या तरुणीचे प्राण वाचवले.
काय झाले नेमके?
मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर गुरुवारी एका व्यक्तीने ट्वीट करुन, एक तरुणी मानसिक तणावातून आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे कळवले होते. मुंबई पोलिसांचे ट्विटर हॅन्डल संभाळणाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिसांना कळवले आणि लागलीच सायबर पोलिस कामाला लागले. सायबर पोलिसांनी ट्वीट करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करुन आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवला. मोबाईल क्रमांकावरुन सायबर पोलिसांनी या तरुणीचे लोकेशन मिळवले असता, ही तरुणी मीरा-भायंदर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1395342844789805059?s=20
(हेही वाचाः कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज! अशी केली जनजागृती)
मुंबई पोलिसांचे कौतुक
सायबर पोलिसांनी तात्काळ तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून, त्यांना सर्व माहिती दिली. त्या तरुणीला आत्महत्या कारण्यापासून वाचवा असे सांगण्यात आले. स्थानिक पोलिस सायबर पोलिसांनी दिलेल्या लोकेशनवर दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी या तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त केले. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल आणि सायबर गुन्हे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तरुणीचा जीव वाचला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून मुंबई पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community