दादर चौपाटीवरील चैत्यभूमी जवळील समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखाच्या जागेचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंट बनवण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट गिरगाव चौपाटीवर बनवला जाणार आहे. गिरगाव चौपाटीवरील अशाचप्रकारे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीवर सेल्फी पॉईंट उभारला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याने याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जात असून, या सेल्फी पॉईंटमुळे गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शिवाय पर्यटकांसाठीही गिरगाव चौपाटी अधिक आकर्षणाचे ठिकाण बनणार आहे.
बनणार सेल्फी पॉईंट
गिरगाव चौपाटीवर उत्तर दिशेला असलेल्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखावर प्लॅटफॉर्म बनवून पाहणी कट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या पाहणी कट्ट्यावरील पायवाटांना काचेचे रेलिंग बनवून हा परिसर सुशोभित केला जाणार आहे. तसेच येथील पोलिस चौकीचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे. चौपाटीवरील या पर्जन्य जलवाहिनीतून बाबुलनाथ व ग्रँट रोड विभागातील पावसाळी पाणी वाहून नेले जाते. सध्या या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखावरील प्लॅटफॉर्मची जागा मोडकळीस आली आहे. त्यामुळे दादर चौपाटीवरील चैत्यभूमी येथील समुद्रातील पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखाचे सुशोभीकरण करुन, पाहणी कट्टा तथा सेल्फी पॉईंट बनवण्याची संकल्पना मांडणाऱ्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवरील या जागेवर अशाचप्रकारे पाहणी कट्टा तथा सेल्फी पॉईंट बनवण्याची सूचना केली.
(हेही वाचाः नेपियन्सी रोड, बाबूलनाथ परिसरातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका)
३ कोटींचा खर्च
त्यानुसार महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून, पात्र कंत्राटदाराची निवड केली. या सेल्फी पॉईंटच्या कामासाठी ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पर्यटकांसाठी पर्वणी
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात येणाऱ्या पाहणी कट्ट्याविषयी बोलताना डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी हे ठिकाण मलबार हिल येथील ऐतिहासिक तलाव तसेच राजभवन या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर असल्याचे सांगितले. या सुशोभीकरणांतर्गत पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखावरील प्लॅटफॉर्मची, प्रेक्षणीय पाहणी कट्ट्याची, तसेच लगतच्या पायवाटांचे रेलिंगसहित सुशोभीकरण केल्याने पर्यटकांकरता ते एक आकर्षक ठिकाण तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ठिकाणावरुन मरिन ड्राईव्ह हे राणीच्या रत्नहाराप्रमाणे भासणारे विहंगम दृश्य पाहता येईल. हे नयनरम्य दृश्य पाहणीसाठी देशी व विदेशी पर्यटकही याठिकाणी आकर्षिले जातील, असाही विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
(हेही वाचाः ओबीसीच्या मुद्यावर महापालिका निवडणुकीचे भवितव्य!)
या कामाला महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण, वास्तू वारसा समिती आदींच्या मंजुरी प्राप्त झाल्याने आयुक्तांच्या मान्यतेनुसार हे काम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community