बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेस्पा (११) वर्षीय सिंहाचे रविवारी निधन झाले. जेस्पा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच २२ सप्टेंबर २०११ रोजी जन्माला आला होता. गेल्या तीन आठवड्यापासून त्याने चालणे सोडून दिले होते. उद्यानात दोन दिवसांपूर्वीच गुजरातहून सिंहाच्या जोडीचे आगमन झालेले असताना उद्यानातील सिंहाने रविवारी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापूर्वीच उद्यानात रवींद्र या सतरा वर्षीय सिंहाचा मृत्यू झाला होता. जेस्पा आणि रवींद्र या सिंहाचे दर्शन पर्यटकांना सफारीतून मिळणे अगोदरच बंद झाले होते.
आर्थरायटीसचा त्रासाने ग्रस्त
रविवारी सकाळी जेस्पाचा मृत्यू झाला. जेस्पा हा उद्यानातील प्रसिद्ध सिंहीण शोभा हीचा मुलगा होता. जेस्पासोबत गोपा आणि छोटी शोभा अशी तीन भावंडे जन्माला आली होती. त्यापैकी छोटी शोभा लहान वयातच मृत्यू पावली. तर गोपा या सिंहीणीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. रवींद्र या वयोवृद्ध सिंहाला आर्थरायटीसचा त्रास होता. कित्येक महिने रवींद्र या उद्यानातील पिंज-यातच निपचित पडून होता. रवींद्रच्या मृत्यूनंतर जेस्पामध्येही आर्थरायटीसची लक्षणे पशुवैद्यकीय अधिका-यांना दिसून आली होती. ९ नोव्हेंबर रोजी पशुवैद्यकीय अधिका-यांच्या टीमने जेस्पाची शारिरीक तपासणी केली असता त्यालाही आर्थरायटीसचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. स्नायूही कमकुवत होत असल्याने जेस्पाची शारिरीक हालचाल पूर्णपणे मंदावली. त्याला बेड सोरच्या जखमाही झाल्या होत्या.
(हेही वाचा ‘भारत जोडो यात्रे’त आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा?)
आता केवळ गुजरातचे सिंह
२५ नोव्हेंबर रोजी उद्यानात गुजरातहून आणलेल्या डी ११ आणि डी २२ या तीन वर्षांच्या सिंह-सिंहीणीचे आगमन झाले होते. आता पर्यटकांसाठी केवळ या दोन्ही सिंहाच्या जोडीच सफारी पुन्हा सुरु केल्यानंतर पाहता येणार आहे.