अयोध्यातील उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Shri Ram Mandir) सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्याआधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अयोध्येतील 84 कोसी परिक्रमा परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात पूर्वीपासून असलेली दुकाने स्थलांतरित केली जाणार आहेत.
पाचशेहून अधिक दारूची दुकाने बंद करण्यात आली
उत्तर प्रदेशचे उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दारूबंदीच्या या निर्णयाची माहिती दिली. श्रीराम मंदिर (Ayodhya Shri Ram Mandir) परिसर हा पूर्वीपासूनच प्रतिबंधित क्षेत्र आहे. आता सरकारने 84 कोसी परिक्रमा परिसर देखील दारूबंदीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाला सूचना देण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. परिक्रमा परिसरात असलेली दारूची दुकाने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. 84 कोसी परिक्रमा क्षेत्रात अयोध्येसह फैजाबाद, बस्ती, आंबेडकर नगर, सुलतानपूर या भागांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात पाचशेहून अधिक दारूची दुकाने आहेत. सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री योगींनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यात हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री योगी म्हणाले होते की, हे धार्मिक शहर आहे, त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. येथे मांस आणि दारूच्या सेवनावर बंदी घातली पाहिजे.
अयोध्या हे शहरी विकासाचे मॉडेल असणार
‘धर्मनगरी’ अयोध्या हे शहरी विकासाचे मॉडेल असेल, असेही ते म्हणाले होते. येथे लोकांना 24 तास, आठवड्याचे सातही दिवस पिण्याचे पाणी दिले जाईल. अनेक विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मन:शांती, समाधान आणि आनंद घेऊन येथून परतावे. उल्लेखनीय आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील गुरुवारी (28 डिसेंबर 2023) अयोध्या दौऱ्यावर आहेत. आता अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम जंक्शन’ करण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी संकुलात चारही वेदांच्या सर्व शाखांचे पारायण व यज्ञ अखंडपणे सुरू आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे देशातील सर्व प्रांतातील नामवंत वैदिक विद्वान आणि यज्ञाचार्यांना या विधीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community