पुण्यात सार्वजनिक वाहतुकीने अर्थात पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून आता तुम्हाला बस लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे. बस वाहतूककोंडीत अडकली आहे, बसला येण्यास उशीर लागेल. या सर्व बाबींचीही माहिती प्रवाशांना समजणार आहे. कारण, पीएमपीएमएल व गुगलचा करार झाला असून दिवाळीपासून या नव्या सेवेला सुरवात होणार आहे. यासाठी पीएमपीने प्रायोगिक तत्त्वावर २० बस व २० मार्गांची निवड केली आहे. चार महिने गुगल याची चाचणी घेईल. त्यानंतर सर्व बस मार्गांवर अंमलबजावणी केली जाईल.
( हेही वाचा : एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल )
प्रवाशांना मोबाईलवर मिळणार माहिती
काही दिवसांपूर्वीच पीएमपी व गुगल यांच्यात सामंजस्य करार झाला. यानंतर गुगलच्या पथकाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली. यापूर्वी पीएमपीने बसचे लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी ‘आयटीएमएस’चा प्रयोग केला. मात्र त्याची माहिती केवळ पीएमपी प्रशासनाला कळत असे. प्रवाशांना माहिती मिळत नव्हती. आता मात्र गुगल ही सेवा मोफत देणार आहे. गुगल मॅप ॲपमध्ये आपण प्रवास सुरु करण्याच्या व पोहचण्याचे ठिकाणाची माहिती देतो, तसाच उल्लेख बसच्या लाइव्ह लोकेशनसाठी करायचा आहे. उदा. गुगल मॅपमध्ये स्वारगेट ते कात्रज असे टाइप केल्यावर त्या मार्गावर धावणाऱ्या बस, त्यांचे लाइव्ह लोकेशन, त्यांच्या वेळा याबाबतची सर्व माहिती प्रवाशांना मोबाईलवर मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community