दोन महिन्यांत निवासी इमारतींचा ‘भार’ वाढला: कोविडचे सुमारे ९० टक्के रुग्ण इमारतींमधील!

झोपडपट्ट्यांपेक्षा रहिवासी इमारतींमधील रुग्ण संख्या तुलनेने जास्त असल्याने, अशा निवासी इमारतींमध्ये नियम मोडलेले आढळल्यास सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. 

दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित निवासी इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत. गृह विलगीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही सर्व विभाग कार्यालयांना आयुक्तांनी दिले आहेत. बाधित रुग्ण संख्या अधिक आढळलेल्या रहिवासी इमारतींमध्ये वावरणारे मोलकरीण, मजूर, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. अशा चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

सक्त कारवाईचे निर्देश

मुंबई महानगरातील कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच, मागील काही दिवसांत बाधित रुग्णांची दैनंदिन संख्या पुन्हा एक हजारावर पोहोचू लागली आहे. ही संख्या रोखून कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रीय पथकाने देखील मागील आठवड्यात मुंबईतील एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभाग क्षेत्रांमध्ये दौरा करुन पाहणी केली. दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांपेक्षा रहिवासी इमारतींमधील रुग्ण संख्या तुलनेने जास्त असल्याने, अशा निवासी इमारतींमध्ये नियम मोडलेले आढळल्यास सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

अशी घतेली जाते काळजी

जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ ह्या दोन महिन्यांत एकूण २३ हजार रुग्ण मुंबईत आढळले. पैकी सुमारे ९० टक्के रुग्ण हे निवासी इमारतींमध्ये राहणारे आहेत. तर उर्वरित म्हणजे सुमारे १० टक्के हे झोपडपट्टी व तत्सम वस्तीत राहणारे आढळले आहेत. हा मुद्दा लक्षात घेऊन रहिवासी इमारतींमधील उपाययोजना सक्त करण्यात येत आहेत. बाधित रुग्ण तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारलेले असतील. एकाच घरामध्ये बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती गृह विलगीकरणात राहत असतील तर, रुग्ण आणि कुटुंब यांच्यासाठी स्वतंत्र खोली तसेच स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था घरी उपलब्ध नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येईल. बाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी गृह विलगीकरणात मास्क वापरणे, सॅनिटायझर चा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

..तर सक्तीने क्वारंटाईन करा

प्रतिबंधित निवासी इमारतींमधील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची, त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही, संपर्कात आल्यापासून सातव्या दिवशी चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अथवा गृह विलगीकरण करुन विषाणूची साखळी तोडण्यावर भर दिला जात आहे.  गृह विलगीकरण नियमाचे पालन करत नसलेल्या व्यक्तींना सक्तीने कोरोना काळजी केंद्र- १ (सीसीसी 1) मध्ये स्थानांतरित केले जात आहे. त्यासाठी सर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कोरोना काळजी केंद्र व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.

मुंबईत साध्य २१४ इमारती सील

ज्या रहिवासी इमारतीत पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत, तिथे संबंधित रुग्ण असलेला मजला प्रतिबंधित(सील) केला जातो. दिनांक ९ मार्च २०२१ रोजी पर्यंतची स्थिती पाहता मुंबईत एकूण २ हजार ७६२ मजले प्रतिबंधित(सील) करण्यात आले आहेत. ह्या सर्व मजल्यांमध्ये मिळून ४ हजार १८३ रुग्ण आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास संपूर्ण निवासी इमारत प्रतिबंधित केली जाते. दिनांक ९ मार्च २०२१ रोजीच्या स्थितीनुसार मुंबईत अशा २१४ इमारती आहेत.प्रतिबंधित मजले तसेच इमारतींमधील बाधित रुग्ण, त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती तसेच संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here