मुंबईतील १ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजारांचे कर्ज मंजूर, पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी कर्ज वाटप

93

फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारसपत्रे देण्यात आली असून १ लाखाहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : पुण्यात रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा, लाल महाल येथून होणार सुरुवात)

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी म्हणजेच १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत होणाऱ्या कर्ज वाटपाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोविड १९ आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराडजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ मिळणार आहे.0 या कर्ज वाटपाचे उद्घाटन मा. पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या २४ विभागांमध्ये २३०१ शिबिरे आयोजित केली. जेणेकरून अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेची माहिती मिळावी. या शिबिरांमध्ये पथविक्रेत्यांना ऑनलाइन अर्ज कसे करावे,‌ याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. यासोबतच या व्यावसायिकांना अर्ज करणे सुलभ व्हावे, यासाठी सहायकांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या बहुआयामी कामामुळे आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारसपत्रे देण्यात आली आहेत. तर १ लाखाहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मुंबईतील दोन लाख फेरीवाल्यांना या कर्जाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून त्यानुसार प्रत्येक फेरीवाल्याला या कर्जवाटपाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.