कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरणाऱ्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे, ती जास्तीत जास्त वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधीच पुढाकार घेऊन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव गोकुळधाम येथे स्थानिक नगरसेविकेने, तर विलेपार्ले येथील शिरोडकर रुग्णालयात स्थानिक नगरसेविकेच्या पुढाकाराने लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारे लोकप्रतिनिधींचा सहभाग लसीकरणामध्ये वाढल्यास मुंबईला लसीकरणाचे लक्ष्य सहज आणि वेळेतही गाठता येणे शक्य आहे.
स्थानिक नगरसेवकांचा पुढाकार
मुंबईतील सध्या महापालिका रुग्णालय, शासकीय व केंद्रीय रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालये अशा ११७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु आहेत. या सर्व केंद्रांमध्ये सोमवारपर्यंत १४ लाख ११ हजार ३२६ जणांच्या लसीकरणाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सुमारे साडेबारा लाख लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला. तर सुमारे १ लाख ६४ हजार लोकांनी लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याने सुरुवातीच्या काळात जे नागरिक यासाठी तयार होत नव्हते, ते आता तयार होताना दिसत आहेत. पण लसीकरणासाठी जनता तयार होत असली तरी त्यासाठीच्या केंद्रांचे प्रमाण कमी किंवा घरापासून लांब असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार अमित साटम तसेच शिवसेना नगरसेविका व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता एक एप्रिलपासून प्रत्येक शाळांमध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचाः कोविडच्या जनजागृतीसाठी महापालिकेचे चित्ररथ सज्ज!)
गोकुळधाम येथे लसीकरण केंद्र
गोरेगाव गोकुळधाम येथे महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या इमारतीमध्ये स्थानिक भाजप नगरसेविका प्रिती सातम यांच्या पुढाकाराने लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक महेश्वर साहू यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनानंतर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या लसीकरण केंद्राला भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट दिली.
गोकुळधाम परिसरतील मोठी गृहसंकुले तसेच आरे कॉलनी मधील पाडे व वस्त्यांमधील नागरिकांना कोविड लसीकरण अधिक सोयीचे व्हावे, याकरता स्थानिक भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिकेकडे लेखी मागणी तसेच सतत पाठपुरावा करुन गोकुळधाम प्रसुती गृहाच्या इमारतीमध्ये लसीकरण केंद्र मंजूर करुन घेतले. त्यामुळे मंगळवारी ६ एप्रिल पासून या केंद्रात प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार असल्याचा विश्वास, सातम यांनी व्यक्त केला.
पार्लेकरांसाठी शिरोडकर रुग्णालयात लसीकरण केंद्र
विलेपार्ले येथील भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या पाठपुराव्याने येथील शिरोडकर रुग्णालयात लसीकरण केंद्र ३१ मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे पार्लेकरांना याठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्योती अळवणी यांनी १ एप्रिल रोजी याच लसीकरण केंद्रात जाऊन पहिला डोस घेतला आणि विभागातील जनतेला लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचाः मुंबईतील सर्व खाजगी तसेच शासकीय महापालिका रुग्णालयांचे होणार ‘अग्निसुरक्षा’ ऑडिट!)
Join Our WhatsApp Community