मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी प्रसाद खैरनार यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)
जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांसोबतच दिव्यांग मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दिव्यांग पुरूष मतदार ९३६४ तर महिला दिव्यांग मतदार ६७५०, दिव्यांग तृतीयपंथी मतदार २ असे एकूण १६ हजार ११६ चिन्हांकीत दिव्यांग मतदार आहे. मतदान केंद्रावर जावून मतदान करता यावे यासाठी ११०६ व्हिलचेअर मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना ६१३ ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण ११०६ स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway वर आता आधुनिक सीसीटीव्ही)
दिव्यांग मतदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंम ॲपबद्दल जिल्ह्यातील एकूण १३ हजार ८८८ दिव्यांग मतदारांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच मतदानाची प्रक्रिया समजावून सांगणे आणि जनजागृती करणे यासाठी २५ सामाजिक तसेच अपंग संस्थांच्या समन्वयाने ८५ मेळावे देखील घेण्यात आले आहेत. तसेच १३२१ मतदारांना ब्रेल वोटर स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी २५ रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग सुलभ बसेस चालविण्यात येणार असून ६१३ ठिकाणी रिक्षा इको व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही खैरनार यांनी कळविले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community