लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘स्वीप’ अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम विधानसभेच्या अंधेरी आणि वर्सोवा मतदारसंघात राबविण्यात आला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातर्फे १६४-वर्सोवा व १६५-अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिलांना मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले. (Lok Sabha Election 2024)
मतदारांमध्ये मतदानाबद्दल जागृती व्हावी आणि जास्तीत जास्त मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात परिमंडळ चारचे सहआयुक्त विश्वास शंकरवार, मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, सुभाष काकडे, वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती पाटील, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद कुऱ्हाडे, १६४-वर्सोवा व १६५-अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे ‘स्वीप’चे अधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Allahabad Court: सरसकट शस्त्रे जमा करणे अधिकाऱ्यांना पडले महागात)
यावेळी ‘स्वीप’च्या माध्यमातून जनजागृती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करताना येणाऱ्या समस्यांबाबत निराकरण करण्यात आले. तसेच जास्तीज-जास्त संख्येने मतदान करण्यासाठी मतदारांना कसे प्रोत्साहित करावे, त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव करून देण्याबाबत प्रबोधन करण्यासाठीही या कार्यक्रमात विशेष कार्य अधिकारी डॉ. दळवी यांनी मार्गदर्शन केले. मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्याकरिता सर्वांनी एकजुटीने मिळून काम करणे गरजेचे आहे. आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडून आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन कुन्हाडे यांनी केले. तहसीलदार स्नेहलता स्वामी, यांनी मतदान केंद्र स्थरीय जनजागृती संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community