Lokmanya Tilak Hospital : प्लास्टिक सर्जरी करून तरुणाच्या खांद्यावरील ओझे केले दूर

लोकमान्य टिळक रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी

97
Lokmanya Tilak Hospital : प्लास्टिक सर्जरी करून तरुणाच्या खांद्यावरील ओझे केले दूर
Lokmanya Tilak Hospital : प्लास्टिक सर्जरी करून तरुणाच्या खांद्यावरील ओझे केले दूर

मुंबईतील शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात (Lokmanya Tilak Hospital) काही दिवसांपूर्वी एक तरुण उपचारांसाठी आला. तो आला तेव्हा त्याच्या जन्मापासून खांद्यावर आणि मानेजवळ असणारी गाठ वाढत वाढत आता वयाच्या १५ व्या वर्षी सव्वादोन किलोची झाली होती.

अत्यंत अवघड आणि जटिल शस्त्रक्रियेतील संभाव्य धोक्यांची ज़ाणीव रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांच्या सहमतीनंतर आणि आवश्यक त्या वैद्यकीय उपचारानंतर त्या तरुणावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. शीव रुग्णालयातील ‘सुघटन शल्यचिकित्सा’ अर्थात ‘प्लास्टिक सर्जरी’ विभागासह इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत अवघड आणि नाजूक असणारी ही शस्त्रक्रिया केली. तब्बल साडेसहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेअंती जन्मापासून असलेली त्या तरुणाच्या मानेवरची गाठ काढली गेली. त्यानंतर त्याच्या खांद्यावरील गाठीचे ‘ओझे’ मोकळे झाले. आता त्याची तब्येत सुधारत असून तो पूर्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध आरोग्य व‌ वैद्यकीय सेवा सुविधा महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत असतात. याअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांद्वारे विविध वैद्यकीय उपचार देण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. शीव परिसरात असणारे लोकमान्य टिळक रुग्णालय हे देखील त्यापैकी एक. याच रुग्णालयात १५ वर्षीय तरुणाच्या मानेवरील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी या १५ वर्षीय तरुणाच्या मानेवर डाव्या बाजूला जन्मापासून गाठ असल्याने उपचाराकरिता आणण्यात आले. ही गाठ हळूहळू वाढत होती. परंतू त्याचा रुग्णास त्रास नव्हता. रुग्ण तपासणी करीता आला असता ही गाठ ‘२२ सेंटीमीटर x ३० सेंटीमीटर’ इतकी वाढली होती. या गाठीमुळे रुग्णाची श्वसननलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला पूर्णपणे झुकली होती. सुदैवाने रुग्णास श्वासोच्छवासास त्रास होत नव्हता. रुग्णाच्या आवश्यक रक्त व इतर तपासण्या करण्यात आल्या असता ही गाठ म्हणजे ‘लिम्फॅटिक सिस्टिम’ व रक्तवाहिन्या यांचे जाळे आहे, असे ‘एमआरआय’ तपासणीत आढळून आले. ही गाठ मानेतील एक मुख्य रक्तवाहिनी (नीला) म्हणजेच ‘इंटर्नल जुगुलर व्हेन’ या शिरेपासून वाढत होती. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अंदाजे साडेसहा तास सुरू होती. शस्त्रक्रियेदरम्यान गळ्याभोवती असणाऱ्या इतर अतिशय महत्त्वाच्या रक्तवाहिन्या, चेतापेशी आणि मांसपेशी यांना कुठेही धक्का न लावता कौशल्याने पार पाडण्यात आली. ही गाठ जवळजवळ ५ पाउंड (सव्वा दोन किलो) वजनाची होती. गाठ काढल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे.

(हेही वाचा – Bharat Gogwale : राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही, भरत गोगवले यांची स्पष्टोक्ती  )

या शस्त्रक्रियेसाठी कार्यरत चमूमध्ये प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुकुंद जगन्नाथन, डॉ. अमरनाथ मुनोळी, सी.वी.टी.एस. सर्जन डॉ. जयंत खांडेकर, व्हॅसक्युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे डॉ. विवेक उकीर्डे, भूलतज्ञ डॉ. शकुंतला बसंतवानी, डॉ. खुशबू कडकिया, डॉ. अश्विनी रेड्डी, डॉ.‌नयना, डॉ. देवेंद्र ठाकूर, डॉ‌. नेहा, डॉ. क्षितिजा, डॉ. मनिषा खरात, डॉ. नवल जेठालिया या तज्ज्ञांचा समावेश होता. त्याचबरोबर श्रीमती राजश्री, श्रीमती शोभा आणि सर्वश्री प्रणीत, दीपक, संदेश, गणेश आणि लव या कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य या शस्त्रक्रियेला लाभले, अशी माहिती लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.