मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोणावळा, कर्जत या घाट भागात सुविधांची अक्षरशः वाणवा आहे. या ठिकाणी जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी व्यवस्थेला साधे स्ट्रेचर उपलब्ध करून देता येत नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. याचे जिवंत उदाहरण समोर आले. लोणावळा घाट परिसरात एका जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिसांना अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.
अशी पोलिसांची झाली परवड!
लोणावळा घाटापासून जामनेर आणि पळसदरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत पडली आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे मुख्य नियंत्रण कक्ष येथून प्राप्त झाली. त्यानंतर सोमवारी, ३१ मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक टी.एन सरकाळे, पो.अंमलदार ज्ञानेश्वर गांगुर्डे, तुषार तुर्डे आणि मंगेश गायकवाड हे सरकारी गाडीने पळसदरी येथे आले. तेथून पुढे जाण्यासाठी मात्र वाहन नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ४ किलोमीटर पायपीट करून घाट उतरला आणि थेट रेल्वे रूळ गाठले. रेल्वे रुळावरून अर्धा तास चालून त्या जखमी महिलेचा शोध घेतला. 44 वयोगटातील एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत तिथे पडली होती. तिच्या कमरेला आणि पायाला जखम झाली होती. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला घेऊन जाण्यासाठी कुठलेही साधन नव्हते. अखेर पोलिसांनी सोबत आणलेल्या चादरीची झोळी बनवून तिला चार किलोमीटर घाट चढून पळसदरी येथे आणले. त्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. अखेर पोलिसांनी खाजगी रुग्णवाहिकेला फोन करून या महिलेला कर्जत येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही हद्द पुणे रेल्वेकडे असल्यामुळे पुणे रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. ही महिला अदिवासी जमातीची असून लोणावळ्यातील कार्ले येथे राहणारी असून आशाबाई वाघमारे असे या महिलेचे नाव आहे.
(हेही वाचा : नागरिकांना पडला ‘निर्बंधांचा’ विसर! रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब ‘रांगा’)
सुविधांचा वाणवा!
कर्जत आणि लोणावळा या घाट परिसरात एखाद्या आदिवासी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे असेल तर कोणतीही साधनसामुग्री नाही, अशी अवस्था आहे. ही दुर्दैवी बाब आहे. या ठिकाणी रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाही. रुग्णाला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरची सुविधा नाही. त्यामुळे पोलिसांना पायी घाट उतरावा लागला. जखमी महिलेला चादरीच्या झोळीतून उचलून पोलिसांना संपूर्ण घाट चढून नेले आणि रुग्णालयात दाखल केले.
Join Our WhatsApp Community