एसटीच्या तिजोरीत महापुरामुळे आला ‘दुष्काळात तेरावा’

17 ते 26 जुलै या 10 दिवसांत 18 कोटी 56 लाख रुपयांचे एसटी महामंडळाला नुकसान झाले आहे.

आधीच तोट्यात असताना आता लालपरीला आणखी तोटा सहन करावा लागत आहे. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात पुन्हा वाढ झाली आहे. 17 ते 26 जुलै या 10 दिवसांत 18
कोटी 56 लाख रुपयांचे एसटी महामंडळाला नुकसान झाले आहे. कोकण, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसामुळे एसटी बसेस फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे 7 कोटी 22 लाख 95 हजार 594 इतके एसटीचे उत्पन्न बुडाले आहे. त्याचबरोबर 11 कोटी 33 लाख 6 हजार 339 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

आधीच तोट्यात त्यात हे संकट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम एसटीला बसला आहे. आधीच एसटी महामंडळाला सुमारे 7 हजार कोटींपेक्षा जास्त तोटा झाला आहे. त्यात आता अतिवृष्टीमुळे सुमारे 18 कोटींचा तोटा वाढला आहे. या दरम्यान राज्यभरातील एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कोकणासह, मुंबईत मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामध्ये मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या विभागांमध्ये बस स्थानकांसह कार्यालयीन साहित्यांचेही नुकसान झाले आहे.

(हेही वाचाः एसटी कर्मचारी संघटना आक्रमक! सातव्या वेतन आयोगासाठी राजीनामे)

असे झाले नुकसान

अतिवृष्टी असलेल्या 10 दिवसांत महामंडळाने औरंगाबाद- 851, नाशिक- 662, मुंबई- 18 हजार 775, पुणे- 14 हजार 246, अमरावती- 1 हजार 805, नागपूर- 2 हजार 271 अशा एकूण 38 हजार 410 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर सर्वाधिक मालमत्तेचे नुकसान मुंबई विभागात झाले असून, तब्बल 9 कोटी 10 लाख 76 हजार 339 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here