म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काढलेल्या ४०८२ घरांच्या लॉटरी सोडतीनंतर आता म्हाडा कोकण मंडळाच्यावतीने तब्बल ४५०० घरांची लॉटरी लवकरच काढली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी केली.
म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने ४०८२ घरांच्या लॉटरीसाठी मागवलेल्या अर्जांची सोडत सोमवारी १४ ऑगस्ट २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित काढण्यात आली. या लॉटरी सोडतीच्या प्रारंभीच प्रास्ताविक करताना म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या लॉटरीत अनामत रक्कम भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या १ लाख २० हजार १४४ अर्जदारांमधून ही सोडत काढण्यात आल्याचे सांगत दस्तावेजाचे प्रमाण १३ वरून ५ करणे आदी प्रकारच्या सुधारणांमुळे अर्जदारांना आता जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.त्यामुळे लॉटरीत जे यशस्वी ठरले त्यांना लघुसंदेश अर्थात एसएमएस प्राप्त होतील आणि त्यांना आपल्याला घर लागले याची माहिती मिळेल. त्यामुळे यामध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदाराला पहिल्या टप्प्यात २५ टक्क्के आणि दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के एवढी रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जिथे घराचा ताबा मिळण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागायचा तिथे आता साडेचार महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लॉटरीनंतर कोकण मंडळाच्यावतीने ४५०० घरांची लॉटरी सोडत काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहिर केले.
(हेही वाचा Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला)
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाची ही लॉटरी अत्यंत पारदर्शक असून इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर केल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनुष्याचा हस्तक्षेप होऊ शकत नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षांत दोन लाख घरांची लॉटरी काढण्याचे ध्येय असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. येत्या काळात नवीन गृहनिर्माण धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न राहिल. यासाठी तज्ज्ञ मंडळींची मदत घेऊन यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे पंढरपूरचे विकास प्राधिकरण म्हणून विकासाचा आराखडा तयार केला जात असून हा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून रावबला जावा अशी इच्छा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community