सध्या राज्याच्या विधानसभेत भोंग्यांचा (Loud Speaker) विषय गाजला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. असे असले तरी राज्यात असे एक गाव आहे, जिथे गावातील लोकांनीच एकमताने सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंगे (Loud Speaker) ७ वर्षांपूर्वीच उतरवले आहेत. या ठिकाणी लग्न कार्य किंवा उत्सवामध्येही भोंगा लावला जात नाही.
नांदेड जिल्ह्यातील बरड गावात ३० जानेवारी २०१८ या दिवशी ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये गावातील सर्व जाती आणि धर्मातील रहिवाशी हजर राहिले. त्या सभेत गावातील वसंत लालमे यांनी गावातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे (Loud Speaker) हटवण्याचा ठराव मांडला. त्यांच्या ठरावाला किशोर देशमुख यांनी पाठिंबा दिला. त्यावर साधकबाधक चर्चा झाली आणि चर्चेअंती हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठराव मंजूर होताच, गावातील सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील भोंगे (Loud Speaker) हटवण्यात आले. नांदेड मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले बरड हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. गावात ८ हिंदू मंदिरे, २ बुद्ध विहार आणि १ मशीद आहे.
(हेही वाचा Tamilnadu मध्ये पुन्हा भाषिक द्वेषाचे राजकारण; बदलले रुपयाचे चिन्ह)
बरड गावात भोंगे वाजवण्यावरील बंदीबद्दल पंचक्रोशीतील सर्वांना माहिती झाली आहे. त्यामुळे, लग्न समारंभ असो किंवा गावातील इतर कोणताही समारंभ असो, भोंगे (Loud Speaker) लावले जात नाहीत. या गावात भोंग्यांऐवजी ध्वनी बॉक्स वापरण्याची परवानगी आहे. अर्थात, ते मर्यादित आवाजात बसवता येतात. आता, या गावात कोणताही साउंड सिस्टम दुकानदार भोंगे भाड्यानेही देत नाही. या गावाचा हा निर्णय राज्यासह देशासाठी खरेतर मैलाचा दगड ठरू शकतो.
Join Our WhatsApp Community