महाराष्ट्रात लव्ह जिहादची १ लाख प्रकरणे; मंगलप्रभात लोढांनी दिली धक्कादायक माहिती 

110

महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. लव्ह जिहादची प्रकरणे समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचार या मुद्द्यांवर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंगलप्रभात लोढा बोलत होते.

आपण महिला सुरक्षा, सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. पण लव्ह जिहाद तसेच महिलांवरील अत्याचार या मुद्द्यावर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणे समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. इंटरफेथ मॅरिज कमिटीबाबत मी बोलू इच्छित नाही. आधी जीआर वाचा, तो वाचल्यानंतर तुम्ही बोलवाल तिथे मी येईन. जीआरमध्ये एकही शब्द असा नाही जो एखाद्याच्या धर्म किंवा वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करेल. पण महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे. श्रद्धा वालकरचे 36 तुकडे केले. तिला मारणारा कोण होता, मरणारी कोणी होती म्हणून तो मुद्दा बनत नाही. लग्नानंतर ज्या मुलीचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महिला बालविकास विभाग करेल.

(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची माहिती गोळा करण्यासाठी एका समितीची स्थापना केल्याची घोषणा राज्य सरकारने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केली होती. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने 13 डिसेंबर रोजी जीआर जारी करुन म्हटले की आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती (राज्य स्तर) प्रामुख्याने विवाहांच्या आकडेवारीनुसार डेटा तयार करेल. जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून 152 प्रकरणे समोर आली आहेत. समितीचे नाव प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बहुतांश प्रकरणांमधील सदस्यांनी सांगितले की, त्यांचा त्यांच्या मुलांशी संवाद तुटला आहे. त्यांना संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची किंवा समुपदेशन घेण्याची आवश्यकता होती, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.