दोन निकाह झालेले असताना एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत तिसरा विवाह केला, एवढ्यावर न थांबता तिला बळजबरीने त्यांच्या धर्मातील प्रार्थना करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या तरुणीने पतीसह पाच जणांविरुद्ध पार्क साईड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पार्क साईड पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दोन लग्नाबाबत अंधारात ठेवून केला तिसरा विवाह
विक्रोळी पश्चिम या ठिकाणी पीडित तरुणी राहते. २०१९ मध्ये या तरुणीला त्याच परिसरात राहणाऱ्या शाहनवाज हुसेन याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे अमिष दाखवून विविध ठिकाणी लॉजवर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणी ही हिंदू असून त्याने तिला त्याच्या दोन लग्नाबाबत अंधारात ठेवून तिच्यासोबत तिसरा विवाह केला. लग्नानंतर त्याचा बनाव उघडकीस आला असता त्याने मी माझ्या दोन्ही पत्नींना घटस्फोट दिल्याचे आपल्या तिसऱ्या पत्नीला (पीडित) सांगितले.
(हेही वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?)
पती सह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नानंतर शहनवाज हुसेन याचे आई वडील मुलाला पीडित तरुणीची सतत तक्रार करून तिचा छळ करीत होते. तिचे घराबाहेर पडणे बंद करण्यात आले, तिला धार्मिक प्रार्थना करण्यासाठी बळजबरी करणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत होऊ लागले होते. अखेर या छळाला कंटाळून कोणाला काहीही न सांगता पीडित तरुणी मामाच्या गावी निघून गेली. मुंबईत ती हरवल्याची तक्रार तिच्या पतीने दाखल केल्यावर ती मुंबईत आली व तिने पार्क साईड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती सह पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, मानसिक छळ, धमकी देणे, हुंडा विरोधी कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.