भांडूप येथील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला ८ मे २०२३ रोजी त्याच परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून, याबाबत त्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन, शुक्रवारी त्यांना निवेदन सादर केले.
जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून महाराष्ट्रात लव्ह जिहादची प्रकरणे घडवली जात आहेत. या प्रकरणात गुन्हेगाराला अटक झाली आहे, परंतु त्या गुन्ह्याला मदत करणारे, त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक बाहेर फिरत आहेत. तसेच या प्रकरणातील पिडीत मुलगी अल्पवयीन असून, गुन्हेगार युवक आणि त्याला सहाय्य करणाऱ्या सगळ्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली आहे.
(हेही वाचा Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग जरी वेगवान असला, तरी…’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सल्ला )
देशभरात लव्ह जिहादच्या केसेस वाढत असून, हिंदू तरुणी लव्ह जिहादच्या शिकार होत आहेत. यापूर्वी वसईच्या श्रद्धा वालकरचे तसेच चेंबूरच्या रूपाली चंदनशिवेचे प्रकरणही आपल्यासमोर आहे. अशा परिस्थितीत वर्तमान घटनेतील आरोपींवर पोक्सो कायद्यातील कलमानुसार कारवाई करावी. या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन, पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस खात्याने देखील योग्य तो अहवाल गृह खात्याकडे पाठवून लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत आग्रह करावा, अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना यावेळी करण्यात आली आहे. तसेच याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास मुंबईतील मातृशक्तीला नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community