रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे ग्रामीण भागांतील महिलांनो सावधान…तुम्ही घरगुती ब्युटी पार्लर्स किंवा साध्या ब्युटी पार्लर्समध्ये फेशियल करायला जात असाल, तर तुमच्या चेह-यावर खूपच कमी दर्जाची सौंदर्य उत्पादने वापरली जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वसईतून साध्या दर्जाचा फेसपॅक, मसाज क्रीम आदी फेशियलमध्ये सर्रास वापरली जाणारी सौंदर्य उत्पादने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे ग्रामीण भागांत जात असल्याची माहिती समोर आली आहे.
वसईतल्या कोमल एन्टरप्राईज ही कंपनी विनापरवाना सौंदर्य उत्पादने मोठ्या आणि घाऊक दराने घरगुती ब्युटी पार्लर्स चालवणा-या महिलांना विकत आहे. या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता आणि ठाणे परिमंडळ २ च्या अधिका-यांनी गुरुवारी धाड टाकली. या कंपनीला सौंदर्य प्रसाधने बनवण्याचा उत्पादन परवानाच नव्हता. या कारवाईत १ लाख ३४ हजारांचा माल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी जप्त केला. धाडीतील चार सौंदर्य प्रसाधनांचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
( हेही वाचा : Weekend ला राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा! )
जप्त केलेली सौंदर्य उत्पादने
फेसपॅक, अस्ट्रिंजंट, मॉश्चरायजर, मसाज क्रीम, मसाज जेल, बी.यू.टी.लाईन रिलॅक्सिंग मिक्स फ्रूट बॉडी, फेस स्क्रब
जप्त केलेला सौंदर्य उत्पादनातील कच्चा माल
टाल्कम पावडर, ग्लिसरॉल मोनोस्टेरेट, लिक्विड पॅराफिन, सुंगंधी द्रव्ये
हलक्या दर्जाच्या उत्पादनांच्या वापराने त्वचा खराब होईल
सौंदर्य उत्पादनातील वापरलेले घटक अपेक्षित प्रमाणात नसतील तर त्वचेला बाधा पोहोचण्याची भीती प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. उदय खोपकर यांनी दिली. त्वचेला कित्येकदा एलर्जीही होऊ शकते. पिंपल्स किंवा अक्नेचा त्रास होऊ शकतो. कित्येकदा मसाजक्रीममधील तेलाचा दर्जा चांगला नसल्यास त्वचेची जळजळ होते, अशी माहितीही डॉ. खोपकर यांनी दिली.
( हेही वाचा : सरकारी नोकरी अपडेट! ‘या’ विभागात होणार ‘२७७६’ पदांची भरती! )
कायदेशीर कारवाईच्या तयारीत
आम्ही कंपनीच्या उत्पादनकर्त्याला बाजारात पाठवलेली उत्पादने परत मागवण्याचा आदेश दिला आहे. ही उत्पादने तपासणीत संशयास्पद किंवा नियमबाह्य पद्धतीने बनवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, तसेच न्यायालयातही याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून दिली गेली.
Join Our WhatsApp Community