लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या पूर्व दिशेची एक मार्गिका रविवारी १७ सप्टेंबर २०२३ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. (Lower Parel Bridge) राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून, तसेच गणेशमूर्ती आगमन मिरवणूक मार्गस्थ करून ही मार्गिका खुली करण्यात आली. ही मार्गिका सुरू झाल्याने करी रोड, लोअर परळ, तसेच दक्षिण मुंबईच्या दिशेने वाहतूक सुलभ होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ, ना.म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर डिलाईल रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर ना.म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा १ असे ३ पोहोच रस्त्यांचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पैकी पश्चिम दिशेची मार्गिका याआधीच १ जून २०२३ रोजी खुली करण्यात आली होती. असे असले तरी, ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ आणि करी रोड स्थानकांना जोडणारा पूर्व दिशेला स्थित मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरील दोन्ही बाजुपैकी किमान १ मार्गिका श्री गणेशोत्सवपूर्वी सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत होते. त्या नियोजनात यश आले आहे. मुंबईकर नागरिकांची वाहतुकीची सोय व्हावी, या उद्देशाने डिलाईल पुलाची पूर्व बाजूस असलेली एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे. (Lower Parel Bridge)
मुंबई जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांचेसह आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, तसेच महानगरपालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती. प्रशासनाच्या नियोजनानुसार गणेशोत्सवापूर्वी पूर्वेकडील बाजूच्या एका मार्गिकेची वाहतूक सुरू झाली आहे.
मार्गिका खुली केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले की, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. १ जून २०२३ रोजी पश्चिम दिशेची मार्गिका उपलब्ध करून दिली होती, तर आता पूर्व बाजूची एक मार्गिका खुली झाल्याने वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. दुसर्या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत या एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू राहणार आहे, असे केसरकर यांनी नमूद केले. स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी या पुलावरून श्री गणेशमूर्ती आगमन मिरवणूक देखील नेली आहे. सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याने भूमिका घेऊन मुंबईतील नागरिकांना सदर पूल वापराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून हा पूल खुला व्हावा, म्हणून पाठपुरावा करण्यात येत होता. आज सुरू झालेल्या मार्गिकेमुळे लोअर परळ, करी रोड या भागातील नागरिकांसोबतच दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुविधा होईल. विशेषतः श्री गणेश उत्सवामध्ये भाविकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता ही मार्गिका खुली होणे महत्त्वाचे होते, आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले. (Lower Parel Bridge)
पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन, तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून व सामंजस्यातून ही मार्गिका खुली झाली, त्यांच्या प्रयत्नांना यश आले, असे आमदार शिंदे यांनी सांगितले. उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप मिळाल्याने या पुलाचे काम वेगाने करणे शक्य झाले आहे. रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर उभारण्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, रंगकाम, पथदिव्याची कामे केली. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे कामही पूर्ण करून ही पहिली मार्गिका सुरू झाली आहे, असे महाले यांनी नमूद केले.
प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पूर्व दिशेला ९० मीटर रेल्वेचा भाग आहे. २२५ मीटरचा भाग मुख्य भाग आणि खाली जमिनीशी जोडणारा कॉंक्रिटचा भाग आहे. पैकी कॉंक्रिटचे आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच संरक्षण कठडे, पथदिवे आणि रंगकाम यासारखीही कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या मार्गिकेचे काम देखील वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Lower Parel Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community