आता गॅस सिलेंडर पुन्हा महागले! इतक्या रुपयांनी वाढले दर

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या सातत्याने वाढत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे आधीच सर्वसामान्य बेजार झाले आहेत. त्यात आता घरगुती गॅस सिलेंडरचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सबसिडी तसेच विनासबसिडी गॅस सिलेंडर तब्बल 15 रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे गाडीतल्या इंधनाबरोबरच पोट भरण्यासाठी लागणारं इंधनही महागल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

दरांत सातत्याने वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल 24 ते 30 पैसे तर डिझेलचे भाव 32 ते 36 पैसे प्रती लिटरने महागले आहेत. तर एलपीजी सिलेंडरचे दर 15 रुपयांनी वाढल्यामुळे आता मुंबईतील 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 926 रुपये झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यापासून आतापर्यंत त्यात 90 रुपयांनी वाढ झाली आहे. 17 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी गॅस सिलेंडरचे दर प्रत्येकी 25 रुपयांनी वाढले होते.

(हेही वाचाः नवरात्रोत्सवापूर्वीच कोविडबाधित रुग्णांचा आकडा सहाशेपार)

पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती

मुंबईत पेट्रोल दरवाढीनंतर आता ग्राहकांना लिटरमागे 109.25 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर 99.55 रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी वाढून 103.24 रुपये लिटर झाले. तर डिझेल 35 पैशांनी वाढून 91.77 रुपये लिटर झाले आहे. जागतिक बाजारातील दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही भाववाढीची दोन मुख्य कारणे असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here