मदुराई रेल्वे स्थानकावर थांबलेल्या २६ ऑगस्टच्या पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. मदुराई रेल्वे स्थानकाबाहेर थांबलेल्या लखनौहून रामेश्वरमकडे जाणा-या ट्रेनच्या ‘खासगी पार्टी कोच’ला लागलेल्या आगीत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दक्षिण रेल्वेच्या अधिका-यांनी दिली. आयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेनच्या डब्यांना ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ‘खासगी पार्टी कोच’मध्ये बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा वापर झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. ‘खासगी पार्टी कोच’चे प्रवासी उत्तर प्रदेशातील लखनौ येथून आले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत होती. तमिळनाडूचे मंत्री पी. मूर्ती यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
(हेही वाचा – Badminton World Championship 2023 : एच एस प्रणॉयचं पदक पक्कं; सात्त्विक साईराज, चिराग जोडीचा पराभव)
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत
या दुर्घटनेची माहिती मिळताच मदुराईचे जिल्हाधिकारी एम एस संगीता रेल्वे स्थानकावर चौकशीसाठी दाखल झाले. रेल्वेच्या डब्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. इतर 20 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
डब्यात सिलेंडर वापरून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न
शनिवारी पहाटे 5.15 वाजता रेल्वेच्या डब्याला आग लागली आणि अर्ध्या तासानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी 7.15 पर्यंत आग आटोक्यात आणली. प्राथमिक तपासात ट्रेनमध्ये स्वयंपाक केल्याचे समोर आले आहे. मदुराई बोडी लाईन परिसरात रेल्वेच्या डब्यात लागलेली आग विझवण्याचे काम अग्निशमन विभाग करत आहे. दक्षिण भारतात दर्शन घेण्यासाठी 60 हून अधिक यात्रेकरू 17 ऑगस्ट रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथून ट्रेनने तामिळनाडूत आले होते. शुक्रवारी नागरकोइल येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर ते शनिवारी पहाटे मदुराईला पोहोचले. मदुराई रेल्वे स्थानकापासून सुमारे 1 किमी अंतरावर त्यांच्या ट्रेनचा डबा थांबवण्यात आला आणि त्यावेळी रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांनी सिलेंडर वापरून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आग लागल्याने संपूर्ण बोगीने पेट घेतला.
ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याची अनुमती नाही
हा ‘खासगी पार्टी कोच’ आहे. तो नागरकोइल जंक्शन येथे 25 ऑगस्ट या दिवशी वेगळा करून मदुराई स्टॅबलिंग लाईनवर ठेवण्यात आला होता. खासगी डब्यातील प्रवाशांनी अवैधरित्या गॅस सिलिंडरची तस्करी केल्याने ही आग लागली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच अनेक प्रवासी डब्यातून बाहेर पडले. काही प्रवासी प्लॅटफॉर्मवरच खाली उतरले होते, असे दक्षिण रेल्वेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अपघातस्थळी पडलेल्या विखुरलेल्या वस्तूंमध्ये एक सिलेंडर आणि बटाट्यांची पिशवी यांचा समावेश होता. त्यातून डब्यामध्ये अन्न शिजवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसून येते. कोणतीही व्यक्ती IRCTC च्या पोर्टल वापरून पार्टी कोच बुक करू शकते. त्यांना गॅस सिलिंडरसारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याची अनुमती नाही. कोचचा वापर केवळ वाहतुकीसाठी केला जाणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community