लम्पी आजार : राज्यातील ९७ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण

129

एकीकडे देशभरात लम्पी आजाराने चिंता वाढवली असताना, राज्यात ९७ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आतापर्यंत ९३ हजार १६६ पशुधन लम्पी रोगमुक्त झाले आहे.

( हेही वाचा : दिवाळीच्या पहिल्याच तीन दिवसांमध्ये फटाक्यांमुळे ३७ आगीच्या घटना)

मंगळवारअखेर ३२ जिल्ह्यांमधील ३ हजार ३० गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख ४३ हजार ८९ बाधित पशुधनापैकी एकूण ९३ हजार १६६ पशुधन उपचाराने रोगमुक्त झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मंगळवारअखेर एकूण १४०.९७ लक्ष लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १३५.५८ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात असून, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार सुमारे ९७ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपचारासाठी सहकार्याचे आवाहन

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.