नाटक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी यांच्यावर नुकतीच यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगाव येथील एच.एन.रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
2020 सालापासून त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यावेळी ही लक्षणे प्रामुख्याने कोरोनाची लक्षणे असल्याचे ग्राह्य धरले जात होते, पण कोरोना काळ संपल्यानंतर त्यांचा त्रास कायम राहिला.
हळूहळू विद्याधर जोशी यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. इमारतीच्या पायऱ्या चढताना, लांबचे अंतर पायी पार करताना जोशी यांना श्वसनाचा त्रास वाढत असल्याचे जाणवू लागले. त्यांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सुरुवात केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना इडीओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस आजाराचे निदान झाले. इडीओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. या आजारात फुफ्फुसावर डाग पडून फुफ्फुसाचे कार्य मंदावते. त्यामुळे फुफ्फुसाचे कार्य पूर्ववत होण्यासाठी त्यांच्यावर ऑक्सिजन थेरपी आणि इतर उपचार करण्यात आले.
(हेही वाचा – Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था ८.३ टक्क्यांनी वाढण्याचा स्टेट बँकेचा अंदाज)
गेल्या वर्षापासून त्यांच्यावर उपचार सुरू झाले, मात्र प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून येत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यावर्षी जानेवारी महिन्यात जोशी यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी बराच काळ लोटला. त्यांना दोन महिन्यांसाठी कार्डिओपलमोनरी उपचार दिले गेले. आता अभिनेते विद्याधर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना कृत्रिम प्राणवायूची आवश्यकता नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community