मुंबईत एफ-उत्तर, एच-पूर्व,एल, एम-पूर्व तसेच पी-उत्तर या विभागात पाच वर्षांपर्यंत मुलांमध्ये गोवरची साथ पसरत असताना यंदाच्या वर्षांत मुंबईत तब्बल १०९ गोवरचे रुग्ण आढळल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यापासून गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना सर्वात जास्त गोवर आजाराचा प्रसार एम-पूर्व विभागात झाला आहे. या विभागांत आतापर्यंत ३४ रुग्ण सापडले असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
( हेही वाचा : देशी दारू प्यायले अन् २४ हत्ती झोपले; ओडिशामध्ये घडला अजब प्रकार)
यंदाच्या वर्षात २२ जानेवारीपासून मुंबईत गोवरचे रुग्ण सापडू लागले आहेत. पालिका आरोग्य विभागाच्या नोंदीत २२ जानेवारी ते २२ ऑक्टोबरपर्यंत गोवरचे रुग्ण मुंबईत आढळले. या काळात मुंबईत १०९ रुग्ण आढळले त्यापैकी ६९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. इतर रुग्णांवर उपचार सुरु असून, महिन्याभराने पुन्हा लक्षणे दिसून येत आहेत का, याची चाचणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. एम पूर्व खालोखाल एल विभागात गोवरचा प्रसार वाढत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. सर्वात कमी रुग्णसंख्या एम-पश्चिमेत आढळली.
गोवर हा आजार आढळून आलेल्या विभागांची रुग्णनिहाय माहिती –
- एम -पूर्व – ३४
- एल विभाग – १९
- एफ – उत्तर – ११
- पी-उत्तर – १०
- एच-पूर्व – ७
- एम-पश्चिम – ५
मुंबईत गोवरची साथ पसरत असल्याची दखल घेत केंद्राचे विशेष पथक मुंबईत दाखल होणार आहे. वाढत्या केसेसबद्दल राज्य आरोग्य विभागाकडून होणारे नियंत्रण कार्यक्रम तसेच कन्टेन्टमेंट विभागात हे विशेष पथक मदत करेल. या पथकामध्ये राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र, लॅडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, कुटुंब व कल्याण विभागाचे पुणे शाखेतील अधिकारी यांचा समावेश असेल. या टीमचे नेतृत्व आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. अनुभव श्रीवास्तव करतील. मात्र ही टीम गुरुवारी दाखल झाली नव्हती. केंद्राचे विशेष पथक नेमके कधी येणार आहे, याबाबत पालिका आरोग्य विभागाने माहिती दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community