लालपरीची अशीही कामगिरी, माल वाहतुकीतून झाली ‘कोट्याधीश’!

188

कोरोना काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या महाकार्गोने अवघ्या वर्षभरात ’महाभरारी’ घेतली आहे. खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या ’महाकार्गो’ने गेल्या  वर्षभरात माल वाहतुकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत, महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा  महसूल जमा केला आहे.

अल्पावधीतच महाकार्गोचा गाजावाजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या कडक निर्बंधांमुळे जीवनावश्यक वस्तू, तसेच इतर मालांच्या वाहतूकीवर विपरित परिणाम झाला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने माल वाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून राज्यभरात अतिशय माफक दरात माल वाहतूक  सेवा सुरू केली. खासगी वाहतुकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ही  माल वाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली. जलद, खात्रीशीर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या माल वाहतुकीला अल्पावधीतच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. माल वाहतुकीला मिळालेला प्रतिसाद पाहून महामंडळाने ’महाकार्गो’ या नावाने हा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळे माल वाहतूकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रुपात ’महाकार्गो’ या नावाने रस्त्यांवर धावत आहेत.

(हेही वाचाः मे महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना ‘नो पेमेंट’?)

अशी आहे कामगिरी

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विभाग नियंत्रकांमार्फत माल वाहतुकीचे नियोजन केले जाते. या माल वाहतुकीवर  महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नियंत्रण ठेवले जात असून, माल वाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. माल वाहतुकीसाठी एसटीच्या ताफ्यात ’महाकार्गो’चे ११५० ट्रक आहेत. महाकार्गोने आतापर्यंत ९५ हजार फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक केली असून, तब्बल १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. माल वाहतुकीच्या माध्यमातून महामंडळाला वर्षभरात ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न  मिळाले आहे.

१०० कोटींचे लक्ष्य

शासनाच्यावतीने रेशनिंगवर पोहोचवला जाणारा अन्नधान्याचा पुरवठा, बी-बीयाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, खासगी कंपन्या याचबरोबर कोकणातील आंबा बागायतदार तसेच सिमेंट कंपन्याही मालाच्या वाहतुकीसाठी  ’महाकार्गो’ ट्रकचा उपयोग करत आहेत. महामंडळाने पुढील वर्षभरात माल वाहतुकीतून १०० कोटी रुपयांपर्यंत महसूलाचे उद्दीष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे.

(हेही वाचाः आता लालपरीचे कर्मचारी पुरवणार महाराष्ट्राला ‘ऑक्सिजन’! कसा? वाचा…)

विविध शासकीय विभागांमार्फत खासगी माल वाहतूकदारांकडून जी माल वाहतूक करण्यात येते, त्यातील २५ टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. मालवाहतुकी संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२३०२४०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही एसटी महामंडळाने केले आहे.


               

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.