अखेर महाविकास आघाडीचे ठरले! नाराजी दूर करण्यासाठी हा काढला मार्ग!

शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच महामंडळाचे वाटप करून तिन्ही पक्षांची नाराजी दूर करण्याचा हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

105

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर या ना त्या कारणाने चर्चेतच राहिली आहे. आता तर प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत अंतर्गत खदखद सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता ही अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी तिन्ही पक्षांनी रामबाण उपाय शोधला असून, आता तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लवकरच महामंडळाचे वाटप!

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीला हजर होते. या बैठकीत महामंडळांसदर्भात चर्चा झाली असून, तीन पक्षांना महामंडळाचे वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे महामंडळाचे वाटप होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद अखेर राष्ट्रवादीला, तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. आजच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच महामंडळाचे वाटप करून तिन्ही पक्षाची नाराजी दूर करण्याचा हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडले! )

शिंदे नेमके काय म्हणाले?

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. कोणताही असमन्वय नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही शिंदे म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.