Mahabaleshwar-Panchgani Tourism: वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे पर्यटकांची संख्या घटली, कारण काय? जाणून घ्या…

144
Mahabaleshwar-Panchgani Tourism: वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे पर्यटकांची संख्या घटली, कारण काय? जाणून घ्या...

राज्यभरात दिवसभर कडाक्याचे ऊन, असह्य उकाडा आणि सायंकाळी रोज कोसळणारा पाऊस असे हवामान असते. काही ठिकाणी तर हवामानाची घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. या बिघडलेल्या हवामानाचा फटका पर्यटनाला बसला आहे. वाई, पाचगणी, महाबळेश्वर (Mahabaleshwar-Panchgani Tourism) येथे यंदा उन्हाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल ३० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन स्थळाची ओळख थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून सर्वत्र आहे. साधारण मार्च महिना उलटला आणि परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या, की उन्हापासून बचाव करत पर्यटनासाठी हजारोंची पावले या थंड हवेच्या स्थळी वळतात. यामध्ये राज्यासोबतच गुजरात, कर्नाटकमधून येणारे पर्यटकही मोठ्या संख्येने येतात; परंतु यंदा मार्चपासूनच राज्यात सर्वत्र तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. अनेक शहर आणि गावांचे तापमान चाळीशी पेक्षा जास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरचे तापमानही यंदा चढेच राहिले आहे.

(हेही वाचा – Kisan Sabha: दूध उत्पादकांचे शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन, काय आहेत मागण्या ? वाचा सविस्तर)

दरवर्षी साधारण एप्रिल ते जूनमध्येदेखील महाबळेश्वरचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस राहते. ते यंदा प्रथमच अनेक दिवस चाळीशीच्या पार गेले होते. उन्हाच्या या तडाख्यासोबतच दिवसभर जाणवत राहणाऱ्या असह्य उकाड्यानेदेखील यंदा हा परिसर हैराण झालेला होता. यामुळे आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाल्याची माहिती पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे.

उन्हापासून संरक्षणासाठी रस्त्यावर हिरव्या कापडाचे छत
यंदाच्या बिघडलेल्या हवामानामुळे इथे येणारे पर्यटक सकाळी उन्हाच्या टोप्या घेऊन निघत होते, तर सायंकाळ होऊ लागताच त्यांना पावसाळी छत्र्याही उघडाव्या लागत होत्या. उन्हामुळे फिरण्यावर जशा मर्यादा येत होत्या तसेच सायंकाळ झाली की, कोसळणारा पाऊस त्यांची वाट रोखत होता. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत तर यंदा प्रथमच उन्हापासून संरक्षणासाठी संपूर्ण रस्त्यावर हिरव्या कापडाचे छत लावावे लागले. याच छताखालून सायंकाळी पावसापासून बचाव करत छत्र्या घेऊन फिरणारे पर्यटक दिसत होते.

साऱ्यांनाच आर्थिक फटका…
या बिघडलेल्या हवामानामुळे यंदा इथे पर्यटक कमी आले. ज्यांनी आगाऊ नोंद केली त्यांनी या हवामानाचा अंदाज घेत आपली भेट रद्द केली. इथे आलेले पर्यटकही फार काळ न रेंगाळता अन्यत्र वळले. या साऱ्याचा फटका पाचगणी-महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेलाही यंदा बसला आहे. पर्यटकांनीच पाठ फिरवल्यामुळे फेरीवाले, छोटे-मोठे विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, प्रवासी वाहतूकदार, नौकानयन- अश्वारोहण व्यावसायिक या साऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवर यंदा याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

थंड हवेचे पर्यटनस्थळही बेजार
यावर्षी ऐन उन्हाळी हंगामात निवडणुका होत्या. त्यातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचे हवामानही यंदा कधी नव्हे ते बिघडले. कडक उन्हाळा, असह्य उष्मा आणि रोज सायंकाळी कोसळणारा पाऊस यामुळे हे थंड हवेचे पर्यटनस्थळही बेजार झाले. पर्यटक कमी आले, आलेले पर्यटकांच्या फिरण्यावरही मर्यादा आल्या. या साऱ्यांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे, अशी माहिती येथील व्यावसायिक योगेश बावळेकर यांनी दिली आहे.

निवडणुकांचाही पर्यटनावर परिणाम
महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक आबाजी ढोबळे यांनी सांगितले की, दरवर्षी महाबळेश्वर येथे साडेअठरा लाख पर्यटक येत असतात. यातील बहुसंख्य पर्यटक उन्हाळ्यात येतात, मात्र या वर्षी कडक उन्हाळा, अवकाळी पाऊस, निवडणुकांमुळेही पर्यटकांच्या संख्येवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत यंदा तब्बल ३० टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. या पर्यटकांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कांतही यामुळे ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.