Mahad Fire : ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश; ४ अजून बेपत्ता

140

महाड एमआयडीसीच्या वसाहतीतील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर (Mahad Fire) तब्बल १८ तासांनी पहिला मृतदेह शोधण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. त्यानंतर पुढे तब्बल तीस तासांनी उर्वरित सात मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अद्याप चार जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ब्ल्यू जेट या कारखान्याच्या पीपी प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर रसायनाच्या पिंपांना आग लागली आणि वायूगळती झाली. त्यामुळे बाहेर न पडता आल्याने हे अकरा कामगार याच प्लांटमध्ये अडकून पडले होते. स्फोट, आग, वायूगळती आणि धूर यामुळे स्थानिक बचाव पथकांना पोहोचणे शक्य झाले नाही. भरीस भर म्हणून स्फोट झालेल्या प्लांटची इमारतदेखील धोकादायक स्थितीत आली होती.

(हेही वाचा Madhya Pradesh : मध्य प्रदेशाला काँग्रेसने अंधारात ठेवले; अमित शाह यांचा हल्लाबोल)

स्थानिक बचाव पथके आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या आधारे अडकून पडलेल्या व्यक्तींना जीवंत अथवा मृत स्थितीत बाहेर काढणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनडीआरएफ, कोलाड येथील सानप रेस्क्यू टीम आणि खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. धुमसत असलेली आग आणि प्रचंड धुराचा सामना करित पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हणजे जवळपास अठरा तासांनंतर पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर ७ जणांचे मृतदेह दुपारी बारा वाजेपर्यंत बाहेर काढले. मृतांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. अखेर डीएनए चाचणीद्वारे या मृतांची ओळख पटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मृतांच्या वारसांना मदत

या दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या वारसांना कारखान्याकडून ३० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. याखेरीज मुख्यमंत्री मदत निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.