भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) याठिकाणी केलेल्या सेवा सुविधांमुळे भिमसैनिक अगदी भारावून गेला. मागील कोविडपूर्वी आणि कोविड नंतर महापालिकेच्यावतीने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी सेवा सुविधांमध्ये अमुलाग्र बदल करत आहे. त्यामुळे यंदा महापरिनिर्वाण दिनी ही सुविधा अधिकच चांगल्याप्रकारे दिल्याने आंबेडकर अनुयायांच्या सेवेमध्ये कुठेही महापालिका प्रशासन कमी पडल्याचे दिसले नाही, उलट चांगल्याप्रकारच्या सुविधांमुळे शिवाजीपार्कमधील जनतेकडूनही यंदाही कामाचे कौतुक होताना दिसत होते. (Mahaparinirvana Din 2023)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार व जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि त्यांच्या टिमने विशेष मेहनत घेत याठिकाणी सेवा सुविधा पुरवून आंबेडकर अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि गर्दीशिवाय त्यांना योग्यप्रकारे दर्शन घेत येईल अशाप्रकारचे नियोजन केले होते. (Mahaparinirvana Din 2023)
यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही. आय. पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. यंदा महिला व नवजात बालकांकरीता चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्षाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले असून समाजमाध्यमांद्वारेही थेट प्रक्षेपण करण्यातआल्याने ज्यांना याठिकाणी येण्यास शक्य नव्हते त्यांना या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली होती. या भागातील महत्वाच्या ठिकाणी तसेच मैदान परिसरात चैत्यभूमीवरील आदरांजलीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. ज्यामुळे भिमसैनिकांना रांगेत राहून दर्शन घेता येत नव्हते, ती मंडळी या स्क्रिनवरुन दर्शन घेत होते. (Mahaparinirvana Din 2023)
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनुयायांच्या निवाऱ्यासाठी बांधलेल्या निवारामध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. याठिकाणी महापालिकेच्यावतीने विविध प्रकारच्या आजारांसंदर्भातील उपचार यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली होती. तर मैदानात असलेल्या विविध संस्थेच्या व्यासपीठावरून बाबासाहेबांवर आधारीत गाणी तसेच पोवाडे तसेच विचार मांडून आपली कलाही सादर केली जात हाती. तर महापालिकेने यंदा भोजन तसेच खाद्यपदार्थांचे वाटपासाठी नियोजनबध्द अशाप्रकारची व्यवस्था केल्यानंतरही अनेक संस्थांनी ट्रक तसेच टेम्पोमधून याचे वाटप या परिसरात अनुयायांसाठी केले. त्यामुळे हे भोजन तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी रांगा लागल्या जात असल्याने अनेक आसपासच्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून येत होती. (Mahaparinirvana Din 2023)
तसेच महापालिकेच्यावतीने प्रत्येक २० ते २५ मीटर परिसरावर पाण्याचे टँकरचीही व्यवस्था केली होती. तर काही संस्थांच्यावतीने पाण्याचे बॉटल्सचेही वाटप होत होते. त्यामुळे जेवणानंतर पत्रावळी, प्लेट तसेच रिकाम्या बॉटल्सचा कचरा महापालिकेने ठेवलेल्या कचरा पेट्या तसेच काळ्या पिशव्यांमध्ये टाकल्या जात होत्या. यासर्व काळ्या पिशव्यांच्या ठिकाणी एकेक स्वयंसेवक तैनात करण्यात आला होता. जो त्यांना या पिशवीत किंवा पेटीत कचरा टाकण्याचे आवाहन करत होता आणि प्रसंगी स्वत:च बाहेर पडलेला कचरा त्या पेटीत जमा करत होता. मैदान परिसरात गुलाबी, पिवळे आणि खाकी रंगाचे कर्मचारी तैनात होते, तर सफेद रंगाच्या टी शर्टमध्ये स्वयंसेवक तैनात होते. त्यामुळे स्वच्छतेबाबत अगदी मायक्रो स्तरावर जावून महापालिकेने यंदा नियोजन केले होते. (Mahaparinirvana Din 2023)
एवढेच नाही तर शौचालय आणि स्थानगृहांच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी तैनात होते आणि ते वारंवार याठिकाणी सफाई करत असल्याने कोणत्याही प्रकारची अस्वच्छता व दुर्गंधी नसल्याने यंदा आंबेडकर अनुयायांना या सुविधांनी अगदी भारावून टाकले. त्यामुळे यंदा खूपच चांगली सुविधा असल्याची चर्चा अनुयायांना रंगलेली पहायला मिळत होती. विशेष म्हणजे यासर्व सेवा सुविधांबाबत महापालिका जनसंपर्क विभागही तेवढाच लक्ष ठेवून होता आणि येणाऱ्या समस्या तसेच तक्रार यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक विभागांशी समन्वय साधून होता. महापालिका जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे आणि त्यांचे सर्व सहायक जनसंपर्क अधिकारी आणि कर्मचारीवृंद हे याठिकाणी तळ ठोकून प्रत्येक बाबींची दखल घेत अनुयायांना प्रसंगी मार्गदर्शनही करत होते. (Mahaparinirvana Din 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community