महाराष्ट्राच्या ‘या’ चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड

138

महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले, तसेच प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील 29 बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (६), पुणे येथील जुई केसकर (15), मुंबई येथील जिया राय (13) आणि नाशिक येथील स्वयंम पाटील (14 ) या बालकांचा समावेश आहे. पदक, 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

(हेही वाचा बाळासाहेबांनी सेनेला युतीत सडवले का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

महाराष्ट्रातील बालकांच्या प्रतिभेचा सन्मान

  • जळगाव येथील शिवांगी काळे हिची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. लहान वयातच धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून शिवांगीने आपल्या आई व बहिणीचे प्राण वाचविले.
  • पुणे येथील जुई केसकर हिची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास ‘जे ट्रेमर ३ जी’ असे नाव देण्यात आले आहे.
  • मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. 13 वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वाटर पॅरा स्विमींग आणि ओपन वाटर स्विमींग मध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.
  • नाशिक येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंमने वयाच्या १० व्या वर्षी ५ कि.मी. अंतर पोहून तर १३ व्या वर्षी १४ कि.मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती, शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-२०२२ पटकाविणाऱ्या २९ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुले आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष २०२१ च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या ३२ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.