मुंबईसह राज्यात निर्बंध कि लॉकडाऊन?

मुख्यमंत्र्यांना जे लॉकडाऊन अपेक्षित आहे, ते निर्बंधाच्या आडून लागू केले जात, अशी प्रतिक्रिया राज्यातील प्रत्येक शहरांमध्ये उमटू लागली आहे.

94

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जनतेला संबोधित करताना वारंवार लॉकडाऊन करण्याचा इशारा देत आहे. परंतु मुंबईसह राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसून सर्वप्रथम या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आणणे आवश्यक आहे. पण मुख्यमंत्र्यांकडून वारंवार लॉकडाऊनची धमकी दिली जात असल्याने प्रत्यक्षात निर्बंध आणि लॉकडाऊन यामधील फरक समजून घेण्यात उध्दव ठाकरे हे कमी पडतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणेत तसेच मित्र पक्ष हे निर्बंधासाठी आग्रही असताना मुख्यमंत्री लॉकडाऊनचा पुनरुच्चार करत असल्याने त्यांना नक्की लॉकडाऊन म्हणायचे की निर्बंध, असा प्रश्न जनतेलाच पडू लागला आहे.

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठरु शकेल!

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना रुग्णांच्या दुसऱ्या टप्प्यातील लाटेनंतर लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला. मात्र, या लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच भाजपने तीव्र विरोध केला आहे. विशेष म्हणजे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षानेच विरोध दर्शवल्याने लॉकडाऊनचा प्रस्ताव गुंडाळून मुख्यमंत्र्यांना निर्बंधावरच समाधान मानावे लागत आहे. प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईसह राज्यात लॉकडाऊन पुन्हा करणे शक्यच नाही. फार तर सरकारला आणि महापालिकेला निर्बंध आणता येतील. परंतु हे निर्बंध कडक करताना कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असेल. सरकारला आधी निर्बंध जारी करावे लागतील आणि त्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करावी लागेल. परंतु त्यानंतरही जनतेकडून त्याचे उल्लंघन झाल्यास तथा नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठरु शकेल,असे त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा : कोरोना रुग्ण वाढले, तरी मुंबईत तीन हजार खाटा रिक्त!)

जमावबंदीच्या नावाखाली संचारबंदीच!

सरकारने रात्री आठ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या जमावबंदीच्या नावाखाली संचारबंदीच लागू करण्यात आल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. जमावबंदीमध्ये पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहे. परंतु रस्त्यांवरुन जाणाऱ्या एकट्या, दुकट्या नागरिकांना हटकून एकप्रकारे संचारबंदीप्रमाणेच कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने निर्बंध आणि लॉकडाऊनमधील अर्थच स्पष्ट होत नाही. त्यामुळे एकप्रकारे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कामाधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून एकाबाजुला सरकार सर्वसामान्य जनतेला रेल्वेप्रवास ज्या ठराविक वेळेत उपलब्ध करून दिला आहे, त्या परिपत्रकाची योग्यप्रकारे व कडक अंमलबजावणी न करता निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊनची कार्यवाही करताना दिसत असल्याचेही चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जे लॉकडाऊन अपेक्षित आहे, ते निर्बंधाच्या आडून लागू केले जात असून या अप्रत्यक्ष लॉकडाऊनच्या प्रतिक्रिया राज्यातील प्रत्येक शहरांमध्ये उमटू लागल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.