मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र चांगलाच चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र चर्चेचा विषय बनला आहे. मात्र यावेळी राजकारण वा ड्रग्स हे कारण नसून, महाराष्ट्राला कोलिशन फॅार क्लायमेट अॅक्शनकडून प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे. स्कॅाटलॅंडद्वारे दिल्या जाणा-या तीन पुरस्कारांपैकी एक जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे युरोपात महाराष्ट्र राज्याचा एकच बोलबाला असून युरोपात ‘जय-जय महाराष्ट्र माझा’चा जयघोष होताना दिसतोय.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्याला भारताचे नेतृत्व करायचे आहे. मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) हे उत्कट वन्यजीवप्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनी आम्हाला अधिक चांगले स्वप्न पाहण्याची म्हणजेच हिरवे भविष्य पाहण्याची संधी दिली आहे. आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच माय प्लॅनेट नावाची चळवळ सुरू केली आहे. आम्ही निसर्गाच्या पारंपारिक पाच घटकांवर लक्ष केंद्रित करत आहोत. असे ग्लासगो येथे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.आत्ताच आम्ही एका महामार्गाचे सोलाराइजेशन केले आहे आणि आम्ही 250 मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार आहोत. आम्ही निविदा कागदपत्रे तयार केली आहेत. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या नवीन महामार्गावरून 250 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहोत. राज्य सरकार सध्या औष्णिक किंवा कोळसा उर्जेसारख्या पारंपारिक उर्जेपासून दूर जात असल्याचही आदित्य पुढे म्हणाले.
स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. pic.twitter.com/hmyMaeyUSw
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2021
देशातील पहिला राज्यव्यापी कार्यक्रम
माझ्या आदित्य नावाचा अर्थ सूर्य असा होतो. भारतात, विश्वाचे बीज म्हणून सूर्यदेवाची उपासना केली जाते. आपल्या बहुतेक प्राचीन ग्रंथांमध्ये, सूर्यदेवाला प्राथमिक स्थान आहे. ग्लासगो, स्कॉटलॅंड येथे बोलताना महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि प्रोटोकॉल मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांना आमच्या मनःपूर्वक सुरू असलेल्या योगदानाबद्दल अंडर 2 कोलिशन द्वारे मान्यता मिळाल्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद झाला आहे.असही ते पुढे म्हणाले.राज्य सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे भारतातील सर्वात औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्याच्या पर्यावरण खात्याची जबाबदारी आहे. 9 हजार 800 हेक्टर पेक्षा जास्त खारफुटी संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचित करून आणि हवामान बदल कमी करणे आणि अनुकूलन या विषयावर देशातील पहिला राज्यव्यापी कार्यक्रम सुरू करून त्यांनी हवामान बदलाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे.