खारघर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला वादाची किनार लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजनावर झालेल्या खर्चावरून राज्य शासनावर बरीच टीका झाली. दरम्यान, या सोहळ्यावर नेमका किती खर्च झाला, याची अधिकृत आकडेवारी आता समोर आली असून या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी तब्बल १७ कोटी ६८ लाख ३८ हजार २६६ रुपये इतका खर्च झाला आहे.
(हेही पहा – The 3 Big Changes : भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि पुरावा कायदा वर चर्चा)
सन २०२२ चे महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थी “डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी” यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या आयोजनासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनायाकडून ई-निविदा प्रकाशित करुन कन्सेप्ट कम्युनिकेशन या संस्थेची निवड करण्यात आली होती. १६ एप्रिल, २०२३ रोजी कार्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे या संस्थेने भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन केले. त्यासाठी १७ कोटी ६८ लाख ३८ हजार २६६ रुपये इतका प्रत्यक्ष खर्च (सर्व करांसहीत) आला.
यापैकी ५० टक्के रक्कम म्हणजेच रुपये ८ कोटी ८४ लाख १९ हजार १३३ रुपये इतक्या खर्चास याआधी वित्तीय मान्यता देण्यात आली होती. उर्वरित ५० टक्के रकमेस स्थानिक व्यवस्थापन समितीने देयके पडताळणी करुन शिफारस केल्यानंतर वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
१३ जणांचा मृत्यू
खारघर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा त्रास होऊन १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर आरोपांची राळ उठवली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे आरोप धुडकावून लावत, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर चेंगराचेंगरी झाली नसून, व्यवस्थेत कुठेही कमतरता नव्हती. ऊष्माघात होवून झालेला श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाला, ही वस्तुस्थिती असून या संदर्भात विरोधकांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत; सरकारी यंत्रणा आणि श्री सदस्य यांच्यात व्यवस्थेबाबत उत्तम समन्वय होता, असे स्पष्टीकरण दिले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community