महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : सोहळ्याची जय्यत तयारी सुरु; लाखोंच्या संख्येने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी उपस्थित

110

महाराष्ट्र भूषण हा राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण २०२२ ने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार १६ एप्रिल रोजी या सन्मान सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा संपन्न होणार आहे. “या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे .

(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; राजकीय परिस्थितीचा घेणार आढावा

सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार असून श्री सदस्य पहाटेपासून घटनास्थळी पोहोचले आहेत. या कार्यक्रमासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य इत्यादी विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच श्री सदस्य मेहनत घेत आहेत.
या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय देखील उपस्थित असणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पालिकेकडून योग्य ती सोय देखील करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगसाठी जागा, वाहतुक सुरक्षेवर देखील यावेळी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यापर्यंत विशेष बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे २५० टॅंकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.