दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये होणार?

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या दहावी आणि बारावी परीक्षांबाबत राज्यातील आमदारांसह पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करुन त्यांची याबाबत मते जाणून घेत आहेत.

88

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, याच वाढत्या रुग्ण संख्येमुळे आधी पहिली ते आठवी आणि नंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थांना पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा घ्यावात, असा प्रश्न निर्माण झाला असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन घेण्यावर सरकार ठाम आहे, मात्र राज्यातल्या वाढणाऱ्या कोरोना रुग्णामुळे परीक्षा आता घेणे शक्य नसल्याने जूनमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

शिक्षणमंत्र्यांची आमदारांसोबत चर्चा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या दहावी आणि बारावी परीक्षांबाबत राज्यातील आमदारांशी चर्चा करत असून, आमदारांशी चर्चा करुन त्यांची याबाबत मते जाणून घेत आहेत. एवढेच नाही तर वर्षा गायकवाड या राज्यातील पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करत असल्याची देखील माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक! लॉकडाऊन लावण्याबाबत होणार चर्चा )

रोहित पवारांचा जूनमध्ये परीक्षा घेण्याचा सल्ला!

दहावी आणि बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करत आहेत, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. ऑनलाईन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही, तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. त्यामुळे जूनमध्ये का होईना ऑनलाईनऐवजी नेहमीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेणेच योग्य होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही आणि भविष्यात त्यांना अडचणही येणार नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.  मुलांची शाळा हेच त्यांचे परीक्षा केंद्र असेल त्यामुळे त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावे लागणार नाही. दरम्यान, परीक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचे लसीकरण करावे व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी. निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले.

शेलारही म्हणाले परीक्षा पुढे ढकला!

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी मांडले. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत काय करावे? याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की,  कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये परीक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आशिष शेलार यांनी मंत्र्यांना सूचित केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.