महाराष्ट्रात १२ हजार ५०० पोलिसांची भरती केली जाणार अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
पोलीस दलात 'पोलीस शिपाई' संवर्गातील १२,५३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे(@CMOMaharashtra) व उपमुख्यमंत्री अजित पवार जी(@AjitPawarSpeaks) यांनी मान्यता दिली आहे.त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो.परीक्षार्थींना तयारीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/0ipMnZqRI9
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 16, 2020
म्हणून पोलीस भरतीचा निर्णय
कोरोना काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. तब्बल साडे बारा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोरानाची लागण झाल्याने पोलिसांचे पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community