महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी

194
मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्य कोरोनाच्या प्रभावाखाली होते. २१ मार्च २०२० पासून राज्यात निर्बंध घातले होते. त्यानंतर दोन वर्षांत हे निर्बंध कधी कडक तर कधी शिथील करण्यात येत होते, अखेर ३१ मार्च २०२२ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्य निर्बंधमुक्त झाले आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आता १ एप्रिल नंतरचे सगळे सण-उत्सव पूर्वीप्रमाणे उत्साहात साजरे करता येणार आहेत.

या बैठकीत राज्यातील कोरोनाचे निर्बंध कायम ठेवायचे की निर्बंध मुक्त करायचे हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर एकमताने राज्यातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत गुढीपाडवा हा सण आहे. त्यावेळी राज्यभर नववर्ष स्वागत यात्रा काढल्या जातात, त्यावेळी मात्र या निर्बंधामुळे मर्यादा येणार, अशी चर्चा सुरु होती, मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे गुढीपाडावाच्या शोभायात्रा मोठ्या प्रमाणात काढता येणार आहे.

मास्क वापरणे ऐच्छिक 

कोरोनामुळे राज्यभर मास्क वापरणे सक्तीचे होते, जे कोणी मास्क वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती, मात्र आता मास्क वापरणेही ऐच्छिक करण्यात आले आहे, ज्यांना मास्क लावायचे आहे, ते मास्क लावू शकणार आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.