कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरवल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करुन निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.
स्थानिक प्रशासनाला स्पष्ट निर्देश
ब्रेक दि चेनमधील निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलिस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन, राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीत मुख्यमंत्री यांनी आज दिलेले निर्देश:
• राज्यात निर्बंध सरसकट शिथिल केलेले नाहीत
• ब्रेक दि चेनचे निकष व ५ पातळ्यांनुसार स्थानिक प्रशासनाने निर्बंधांचे निर्णय घ्यावे
• गर्दी होऊ देऊ नये
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 6, 2021
(हेही वाचाः …तरच मुंबईत चित्रीकरणाला परवानगी)
…तर मोठे आव्हान उभे राहील
गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पाच पातळ्या म्हणजे कोरोनाची पूर रेषा
दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्णसंख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले, तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणांतील पाणी साठ्यावर लक्ष ठेऊन असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पावले उचलतो, अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरता या पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः आता ‘बाप्पा’ही पाहत आहेत ‘नियमावली’ची वाट)
शंका असेल तर निर्बंध सुरुच ठेवा
कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरवल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील, तर व्यवहारांवर निर्बंध घाला. कुठल्याही दबावाला बळी पडू नका, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनांना दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्यासमोर कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे, हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरू कसे होतील हे पाहणे, एवढ्याचसाठी निर्बंधांच्या या पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.
कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील गृहीत धरणार
नागरिकांनी कोविडच्या काळात आरोग्याचे नियम पाळून, तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे. यासाठी आपापल्या जिल्ह्यात पुरेशी जनजागृती करा. ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, त्याला रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गावाचे आवाहन केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारी देखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचाः मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! लेव्हल ३ची बंधने लागू! )
गर्दी चालणार नाही
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले, तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पहायचे आहे. दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरू ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या-त्या भागातील प्रशासनाने ठरवायच्या आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा. रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community