-
प्रतिनिधी
महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्यात पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे ३१ मार्च २०२५ पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे (Maharashtra Eco Glamping Festival) आयोजन केले आहे. २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा हा एक भाग असून, या महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले.
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रायोगिक महोत्सव
पर्यटनमंत्री देसाई म्हणाले की, २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. हा देशपातळीवरचा एक मोठा धार्मिक सोहळा असल्यामुळे संपूर्ण देशभरातून लाखो भाविक नाशिकला येणार आहेत. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ‘रीलिजियस हब’ म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या या इको ग्लॅम्पिंग महोत्सवाच्या (Maharashtra Eco Glamping Festival) माध्यमातून पर्यटन क्षेत्राचा विकास, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा, निसर्ग पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीच्या जतनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्लॅम्पिंग हा संकल्पना-आधारित पर्यटन प्रकार असून, नैसर्गिक सौंदर्य आणि आलिशान निवास व्यवस्थेचा तो अनोखा संगम आहे.
(हेही वाचा – ATM Money Withdrawal : एटीएममधून पैसे काढणं आता महागणार? रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम काय सांगतात?)
महोत्सवातील मुख्य आकर्षण
महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवात (Maharashtra Eco Glamping Festival) पर्यटकांसाठी खालील आकर्षणांची योजना करण्यात आली आहे :
- सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक खाद्य महोत्सव – महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद.
- साहसी पर्यटन अनुभव – पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी, जलक्रीडा आणि रिव्हर राफ्टिंग यांसारख्या साहसी खेळांची संधी.
- निसर्गरम्य ग्लॅम्पिंग अनुभव – गोदावरी नदीच्या बॅकवॉटर परिसरात आलिशान तंबूंमध्ये पर्यटकांना निवास व्यवस्था.
- शेती आणि ग्रामीण जीवनशैली अनुभव – शेतीच्या विविध प्रयोगांमध्ये भाग घेण्याची संधी आणि पारंपरिक चुलीवर शिजवलेल्या जेवणाचा आनंद.
- वाईन टूरिझम – नाशिकमधील प्रसिद्ध वाईन उत्पादन प्रक्रियेची माहिती आणि चाखण्याची संधी.
- स्थानीय बचतगटांचे प्रदर्शन आणि हस्तकला विक्री दालने – स्थानिक कलाकार आणि महिलांनी बनवलेल्या हस्तकलांची विक्री आणि प्रदर्शन.
पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम
पर्यटनमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राशी संबंधित भागधारक, ट्रॅव्हल एजन्सी प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाणार आहे. तसेच पर्यटन व्यावसायिक, ट्रॅव्हल एजंट आणि गुंतवणूकदार यांचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमही होणार आहे.
(हेही वाचा – ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर ‘हे’ असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष)
नाशिकमधील प्रमुख पर्यटन स्थळे
गोदावरी नदीला ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते आणि ती धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. या भागातील इतर आकर्षक स्थळे पर्यटकांसाठी खुली केली जातील, त्यामध्ये –
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
- पंचवटी आणि रामकुंड
- मांगी-तुंगी मंदिर
- सप्तश्रृंगी गड
- पांडव लेणी
- तोफखाना केंद्र आणि संग्रहालये
- धम्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ
ग्लॅम्पिंग महोत्सवामुळे पर्यटन उद्योगाला नवा वेग
इको ग्लॅम्पिंग महोत्सवाच्या (Maharashtra Eco Glamping Festival) माध्यमातून नाशिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल आणि येथील धार्मिक, सांस्कृतिक तसेच साहसी पर्यटन वाढीस लागेल. येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, राज्यभरातील पर्यटकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community