गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीजेचे संकट निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी लोड शेडिंग करण्यात येत आहे. याचा फटका शेती आणि अनेक उद्योगांना बसत आहे. त्यामुळे राज्यात लोडशेडिंग करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. लोड शेडिंग किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही, तसेच कुठल्या भागात किती वेळासाठी लोड शेडिंग करण्यात येईल याची माहिती लवकरच देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
जनतेने त्रास सहन करावा
लोड शेडिंग कधीपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही. कारण खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. वीजेचे अनेक प्लँट बंद आहेत त्यामुळे वीजेचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने वीजेची काटकसर करावी, असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे. लोड शेडिंगचे वेळापत्रक वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांपर्यंत पोडोचवण्यात येणार असून राज्यातील जनतेने थोडे दिवस त्रास सहन करुन राज्य सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती देखील नितीन राऊत यांनी केली आहे.
(हेही वाचाः आता ऊर्जामंत्री म्हणतात, राज्यातील भारनियमनाला केंद्रच जबाबदार!)
कुठे होणार लोड शेडिंग?
ज्या भागांमध्ये वीज वितरण होऊन सुद्धा वीजेची थकबाकी आहे, तसेच जिथे विजेची चोरी मोठ्या प्रमाणावर होते अशा जी-1, जी-2, जी-3 भागांमध्ये लोड शेडिंग करण्याचे आदेश दिल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजेची थकबाकी लवकरात लवकर भरावी आणि चो-या थांबवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
केंद्र सरकारकडे बोट
कोळशाच्या खाणीतील कामगारांचा संपामुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने देखील रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियोजनातील चुकांमुळे वीजेची टंचाई निर्माण झाली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
…म्हणून विजेचा तुटवडा
अशा परिस्थितीत आपण महाराष्ट्रात लोड शेडिंग होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. पण अदानी पॉवर्स कंपनीने आपल्या प्लँटमधील वीज पुरवठा कमी केला आहे. त्यांच्यासोबत राज्य सरकारचा 3 हजार 100 वॅट पॉवर सप्लायचा करार झाला होता, पण त्यांच्याकडून केवळ 1 हजार 765 मेगावॅटचा पुरवठा करण्यात आला. तसेच जेएसडब्ल्यूचा प्लँट बंद झाल्यामुळे देखील वीजेची तूट निर्माण झाली आहे. सीजीपीएल कंपनीकडे कराराप्रमाणे 760 मेगावॅट वीजेची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 630 मेगावॅटचीच मागणी पूर्म करण्यात आली त्यामुळे राज्यात लोड शेडिंग करण्यात आल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
(हेही वाचाः मिटकरींचं ‘ते’ विधान योग्य नव्हतं, जयंत पाटीलांनीच दिली कबुली)