महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने दुप्पट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. परिणामी कोरोनाचा हा कहर रोखण्यासाठी राज्य सरकारने आता ‘ब्रेक दी चेन’ या नावे कडक नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही जनसामान्यांमध्ये याविषयी तितके गांभीर्य दिसत नाही, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी, ‘जर जनतेने कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर अवस्था बिकट होईल’, अशी भीती व्यक्त केली.
राज्यात २ स्ट्रेनचा प्रसार!
राज्यात १५ ते २० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाचे २ स्ट्रेन आढळून आले आहेत. हे स्ट्रेन अतिशय गंभीर आहेत, असे डॉ. शेखर मांडे म्हणाले. खरे तर या स्ट्रेनबाबत सावधानता बाळगली पाहिजे. म्हणून जे कोणी कोरोनाबाधित आढळून येतात, त्यांनी तातडीने आपल्या संपर्कात येणाऱ्यांना संपर्क करून सतर्क होण्यास सांगणे आणि चाचणी करून घेण्यास तसेच विलगीकरण करण्यास सांगणे गरजेचे आहे, असेही डॉ. मांडे म्हणाले. मात्र त्याच वेळी सध्या लसीकरण सुरु आहे. त्यावर जोर दिला पाहिजे. कोव्हीशील्ड, कोवॅक्सिन या दोन लसी या दोन नव्या कोरोनाच्या स्ट्रेनवरही परिणामकारक ठरत आहेत, त्यामुळे सर्वांनी बिनदिक्कत लसीकरण करून घ्यावे, असेही डॉ. मांडे म्हणाले.
(हेही वाचा : ब्रेक द चेन : काय बंद, काय सुरु? जाणून घ्या सविस्तर नियमावली!)
लोकांच्या निष्काळजीपणाचा परिणाम!
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे सोडून दिल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. फ्रांस, इटलीमध्ये तिसरी लाट आली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेला ताबडतोब नियंत्रणात आणली पाहिजे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असेही डॉ. मांडे म्हणाले.
कोरोना महामारी लाटांमधून येणारच!
गेल्यावर्षी कोरोनाग्रस्त रुग्णांचे आकडे कमी होते, कारण त्यावेळी नागरिकांमध्ये भीती होती, गांभीर्यदेखील होते, मात्र आता हे गांभीर्य कमी झाले आहे. त्याचा हा परिमाण आपण भोगत आहोत. ही जागतिक महामारी आहे. असे रोग लाटेच्या साहाय्याने येत असतात, हे गृहीत धरले पाहिजे, परंतु येणारी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घटक ठरू नये, म्हणून पहिल्या लाटेला नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे आता जर महाराष्ट्रात कोरोनच्या तिसऱ्या लाटेची शक्यता दिसत असेल तर दुसऱ्या लाटेला लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची गरज आहे, असेही डॉ. मांडे म्हणाले.
या कारणांमुळे कोरोना पुन्हा वाढला!
- गेल्यावर्षी कोरोना आला तेव्हा आपण सर्व जण सतर्क होतो. त्यामुळे कोरोनाला नियंत्रित ठेवू शकलो. पण जेव्हा कोरोना नियंत्रणात आला, तेव्हा आपण सर्वजण पुन्हा बिनधास्त झालो आणि नियमांचे पालन करणे सापडून दिले.
- कोरोना विषाणूचे नवे स्ट्रेन येत आहेत. ब्रिटेनमधील स्ट्रेन तुलनेत अधिक वेगात पसरतो. भारतात तो आढळून आला आहे.
- कोरोना विषाणू हा खुल्या हवेत पसरत नाही, तो बंदिस्त ठिकाणी अधिकाधिक संसर्ग करतो. हे मागील वर्षांपासून आपल्याला माहित होते, म्हणून दारे-खिडक्या उघडून ठेवा, अशा सूचना देण्यात येत होत्या. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्ण संख्या कमी होताच आपण सगळ्यांनी बंदिस्त सभागृहात लग्न कार्य, पार्ट्या सुरु केल्या, त्यामुळे कोरोना वाढला.