सध्या राज्यात अवकाळी पावसाने हैदोस घालायला सुरुवात केली आहे. राज्यातील काही भागात गारपीट झाली. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत. कुठे ज्वारी, गहू, हरभरा तर कुठे द्राक्ष, आंबा, केळी या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.
सोलापूर जिल्ह्यात आठ तालुक्यातील १०४ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे ३,४६९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बाग पूर्णपणे तयार झाली होती. काही दिवसात पीक बाजारात येणार होते. मात्र, वादळी वारा आणि अवकाळी पावसानं हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे
हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील हिंगोली वसमत औंढा नागनाथ सेनगाव कळमनुरी अशा जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. शेतातील गहू, ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
(हेही वाचा दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना ऑफर, म्हणाले… )
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटी झाली आहे. मुदखेड तालुक्यातील कलिंगड, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे च्या बांधावर जाऊन पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली.
जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अनेक भागात केळीसह काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका आणि ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील चांदवड, येवला, निफाड, बागलाण, सटाणा देवळा आदी तालुक्यात कांद्यासह द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, उगाव, देवपूर, ब्राह्मणगाव, रानवड आदी भागांत पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षबागा संकटात सापडल्या, तर येवला, नांदगाव, देवळा तालुक्यात कांद्यासह मका, गहू, डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.आहे.