आता मोफत ‘शिवभोजन’ बंद होणार! किती रुपये मोजावे लागणार? वाचा

15 एप्रिल 2021 पासून मात्र मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

कोरोनाच्या दुस-या लाटेने राज्यात थैमान घातल्यानंतर राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाज घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिल पासून मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र आता राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे ठप्प झालेले व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीची योजना आता बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

(हेही वाचाः शिवसेनेची शिवभोजन थाळी; सिद्धिविनायक मंदिराची तिजोरी झाली रिकामी )

इतके रुपये मोजावे लागणार

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभआगाने याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी पूर्वीप्रमाणेच 10 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यात एकूण 1 हजार 320 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत.

…म्हणून मोफत शिवभोजन 

‘भुकेलेल्यांना अन्न’ या सूत्रानुसार राज्यातील गरीब-गरजूंना स्वस्त दरात पोटभर चांगले अन्न देण्यासाठी राज्य सरकारने जानेवारी 2020 रोजी 10 रुपयांत शिवभोजन थाळीची योजना सुरू केली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 29 मार्च 2020 पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिली जात होती. 15 एप्रिल 2021 पासून मात्र मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

(हेही वाचाः शिवभोजन “थाळी” झाली एक वर्षाची)

मात्र आता कोरोना संसर्ग राज्यात कमी झाल्यामुळे ही मोफत योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. या योजनेची मुदत 14 सप्टेंबर रोजीच संपलेला आहे.

पार्सल सेवाही बंद

राज्यातील कडक निर्बंधांमुळे शिवभोजन थाळीची पार्सल स्वरुपात देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला होता. आता ही सेवाही बंद करण्यात येणार असून, दररोज दीडपट थाळी वाटप करण्याचे उद्दिष्टही आता राहणार नाही. 15 एप्रिल 2021 पासून दररोज 2 लाख शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here