विद्यार्थ्यांनो… आता निवांत पेपर सोडवा, लेखी परीक्षेसाठीची वेळ वाढली

124

कोविड काळात शाळा व कॉलेजमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले होते. या माध्यमातून शिक्षण घेताना सुरुवातीला विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता पुन्हा एकदा शिक्षणसंस्था ऑफलाईन सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता आधीप्रमाणे लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

या लेखी परीक्षेसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे 15 मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)

प्रति तास 15 मिनिटे वाढवून मिळणार

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देताना त्यांना अधिकचा वेळ लागू शकतो. यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा वेळ वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली असून, आता उच्च शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी तासामागे 15 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.

उदय सामंत यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

(हेही वाचाः या कारणामुळे हापूसची निर्यात कमी होणार)

युवासेनेची मागणी

कोरोना काळात बहुपर्यायी प्रश्न(MCQ)या माध्यमातून परीक्षा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा देण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेच्या अर्धा ते एक तास वाढवून देण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना करण्यात आली होती.

(हेही वाचाः आता महाविद्यालयात शिकता येणार सायबर सुरक्षा अभ्यासक्रम!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.